Zee Marathi Kamali Promo : ‘कमळी’ने वार्षिक परीक्षेत मोठं यश मिळवलं असून, ती मुंबई विद्यापीठातून पहिली आली आहे. शहरातून मुंबईत गेल्यावर भरपूर अभ्यास करेन असं वचन कमळीने आपल्या आबांना म्हणजेच आजोबांना दिलेलं असतं. आता आबांचं वचन पूर्ण केल्यावर कमळी आपल्या गावी निघाली आहे. आबा या जगात नाहीत हे सत्य कमळीला माहीत नसतं. आबांच्या जाण्याने कमळी पूर्णपणे खचून जाईल आणि पुन्हा एकदा माघारी येईल याविचाराने तिची आई हे सत्य तिच्यापासून जवळपास वर्षभर लपवून ठेवते. पण, आता वर्षभराने हे सत्य तिच्यासमोर उघड होणार आहे.
कमळी गावी जाऊ नये यासाठी बंड्या आणि हृषी अनेक प्रयत्न करतात. पण, शेवटी जे घडायचंय ते घडतं…कमळी आणि निंगी गावी येऊन पोहोचतात. वर्षभराने गाव पाहिल्यावर कमळीचं मन भरून येतं. विद्यापीठातून कमळी पहिली आल्याचं सर्वांना समजतं आणि तिचं गावी जोरदार स्वागत केलं जातं. कमळीला फेटा बांधतात, गुलाल उधळून वाजत-गाजत तिचं स्वागत करतात. पण, याचवेळी तिच्या घरी आबांचं वर्ष श्राद्ध देखील असतं. आबांनी गावच्या विकासात बराच हातभार लावलेला असतो. यामुळेच त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी गावात बॅनर लावलेला असतो.
कमळी पहिली आली असल्याने संपूर्ण गावात तिची मिरवणूक निघते. पण, शेवटी कमळी आबांच्या निधनाचा बॅनर पाहते. त्या क्षणी तिला खूप मोठा धक्का बसतो. कमळीच्या चेहऱ्यावरचं हसु एका क्षणात नाहीसं होतं आणि डोळ्यात अश्रूंच्या धारा वाहू लागतात.
आबांचं वर्षभरापूर्वीच निधन झालंय…हे समजल्यावर ती प्रचंड खचते. कमळी त्यांच्या बॅनरकडे बघत जमिनीवर बसते आणि रडू लागते. तिचा आजोबांवर प्रचंड जीव असतो आणि ते आपल्याला कायमचे सोडून गेलेत ही गोष्टही आपल्याला माहिती नाही याचा तिला भयंकर त्रास होणार आहे.
आता कमळीची आई सरोज आपल्या लेकीची कशी समजूत काढणार आणि महत्त्वाचं म्हणजे गावी गेल्यावर सरोज तिला तिच्या बाबांविषयी सांगेल का, ती खरी कोणाची नात आहे हे कमळीला कळेल का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ‘कमळी’ मालिकेचा हा विशेष भाग ५ आणि ६ जूनला रात्री नऊ वाजता झी मराठी वाहिनीवर प्रसारित केला जाईल.
