Kamlakar Satpute on Reality Shows: ‘शहाणपण देगा देवा’, ‘मर्डर मिस्री’, ‘खो-खो’, ‘इलू इलू १९९८’ अशा चित्रपटांतून कमालकर सातपुते यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. ‘कॉमेडी एक्स्प्रेस’ या शोमधून त्यांना मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली.
अभिनेते कमलाकर सातपुते यांनी नुकतीच ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या कारकिर्दीबद्दल मोकळेपणाने संवाद साधला. तसेच, अनेक किस्सेही सांगितले. तसेच, सध्या ते कोणत्या शोमध्ये का दिसत नाहीत, यावरही त्यांनी वक्तव्य केले.
“खूप समस्यांना सामोरं…”
अनेकदा कॉमेडी कलाकारांवर खटला दाखल झाल्याचे पाहायला मिळते. आपण जे बोलणार आहोत त्याचे चुकीचे पडसाद उमटले, तर किंवा आपल्याला जे बोलायचं आहे त्याचा चुकीचा अर्थ काढला गेला तर? अशी मनात कधी भीती असते का? यावर कमलाकर सातपुते म्हणाले, “झी मराठीवर घडले बिघडले नावाची मालिका होती. श्रीरंग गोडबोले आणि केदार शिंदे दोघंही दिग्दर्शन करायचे. केदार किंवा रंगादादा वर्तमानपत्रातील बातम्यांवर स्क्रीनप्ले लिहायचे. त्यावर आम्ही प्रहसन सादर करायचो, जो अर्ध्या तासाचा एपिसोड असायचा. थेट भाष्य केलं जायचं. आम्ही एक एपिसोड केला होता. त्यानंतर झीच्या ऑफिसवर दगडफेक झाली होती.”
पुढे ते म्हणाले, “लोकनाट्य आहे, त्यामध्ये आपण थेट बोलू शकतो. जे समाजात दिसतं, ते विनोदी पद्धतीनं सांगायचं; पण आता ते तसं राहिलं नाही. त्यामुळे साहजिकच अशा गोष्टी करताना भीती वाटते. ‘यदाकदाचित’ हे नाटक आता केलं, तर चालणारच नाही. तेव्हा तरी आम्ही त्याचे प्रयोग केले. आनंद दिघेसाहेब आमच्या पाठीशी उभे राहिले आणि त्यामुळे त्याचे प्रयोग होऊ शकले; पण आता त्याचे प्रयोग होणं अशक्य आहे. आता आम्ही कुठे कार्यक्रम करत असताना अशा गोष्टी बोलणं टाळतो. कारण- नंतर खूप समस्यांना सामोरं जावं लागतं.”
स्टॅण्डअप कॉमेडीबद्दल कमलाकर सातपुते म्हणाले, “सोशल मीडियावरच मी पाहिलं आहे. काही लोक खूप छान करतात; मात्र काही जण ते का करतात, असा प्रश्न पडतो. लोकही त्याला प्रतिसाद देतात. चूक सादरकर्त्यांची नाही. लोक जातात, प्रतिसाद देतात म्हणून ते सादर करतात. जशी मागणी, तसा पुरवठा असतो. सगळेच वाईट, असं आपण म्हणू शकत नाही. लोकांना जे आवडतं, ते सादरकर्ते करतात. त्यामुळे कोणा एकाला दोष देण्यात काहीच दोष नाही.”
“महाराष्ट्राची हास्यजत्रा हा शो…”
आताच्या रिअॅलिटी शोबद्दल काय मत आहे? यावर ते म्हणाले, “मी सगळे रिअॅलिटी शो बघतो. अगदी ‘बिग बॉस’पासून महाराष्ट्राची हास्यजत्रापर्यंत सगळे शो मी पाहतो. महाराष्ट्राची हास्यजत्रा हा शो लोकांना आवडतो आणि त्याचं कारण आहे ते म्हणजे त्यामध्ये जो विनोद आहे, तो निखळ असतो. त्यामधील कलाकार खूप निरागसपणे ते सादर करतात, त्यामुळे तो शो लोकांना आवडतो. असे शो याआधी आले होते, जे नंतर बाजूला पडले. त्यामुळे लोकांना निखळ विनोद आणि त्यांच्याशी साध्यर्म्य साधणारं काही असेल, तर ते आवडतं.””
पुढे या मुलाखतीत त्यांना विचारले गेले, की रिअॅलिटी शोपासून का दूर आहेस? त्,यावर ते म्हणाले, “रिअॅलिटी शोपासून दूर असण्याचं काही कारण नाही. कोणी विचारत नाही, हा एक भाग आहेच. दुसरी गोष्ट अशी की जेव्हा विचारणा होते, तेव्हा नेमकं काहीतरी दुसरं सुरू असतं. बऱ्याच लोकांना असं वाटतं की, तेच तेच काम करणं टाळलं पाहिजे. पण, माझं तसं काही म्हणणं नाही. जे काम येईल ते करणं महत्त्वाचं आहे. ज्या कामामुळे लोक ओळखतात, ते करायला काय हरकत आहे? आम्हाला ‘कॉमेडी एक्स्प्रेसमुळे ओळखतात. त्यामुळे तेच काम पुन्हा करायचं असेल, तर हरकत नाही”, असे म्हणत कमलाकर सातपुते यांनी त्यांचे मत सांगितले.
