मनोरंजन विश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांच्या वैवाहिक जीवनात अनेक अडचणी आल्या, अनेक कठीण प्रसंगांना त्यांना सामोरं जावं लागलं. परंतु, त्यांनी त्यामधून मार्ग काढत नव्याने आयुष्याची सुरुवात केली. यापैकीच एक म्हणजे हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री काम्या पंजाबी. अशातच आता तिने तिच्या एक्स पतीमुळे तिला खूप त्रास झाला होता आणि तिचा छळ करण्यात आलेला याबद्दल सांगितलं आहे.

टेलिव्हिजन अभिनेत्री काम्या पंजाबीने तिच्या पहिल्या लग्नातील कठीण काळाबद्दल मोकळेपणाने भाष्य केलं आहे. या काळात तिला घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागला, काम करण्यावरही निर्बंध होते. मात्र, तिच्या मुलीने त्यांच्यातील एक भांडण पाहिल्यानंतर काम्याने हे नातं संपवण्याचा निर्णय घेतला. असं तिने सांगितलं आहे. अभिनेत्रीने यापूर्वी उद्योजक बंटी नेगीशी लग्न केलं होतं. दोघांना आरा नावाची मुलगी आहे. लग्नाच्या दहा वर्षांनंतर काम्या आणि बंटी विभक्त झाले. त्यानंतर काम्याने २०२० मध्ये शलभ डांग यांच्याशी दुसरं लग्न केलं.

लग्नाआधीही व्हायचे प्रचंड वाद

सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत काम्याने सांगितलं की, तीन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर तिने वयाच्या २५व्या वर्षी पहिल्या पतीबरोबर लग्न केलं. मात्र, लग्नाआधीच हे नातं योग्य दिशेने जात नसल्याचे संकेत तिला मिळाले होते. तिच्या आई-वडिलांनीही तिला हे लग्न न करण्याचा सल्ला दिला होता. अभिनेत्री म्हणाली, “आमचं आधीपासूनच पटत नव्हतं. लग्नाआधीही आमच्यात सतत भांडणं व्हायची. परिस्थिती इतकी बिघडली होती की, आम्ही लग्न न करण्याचा निर्णय घ्यायला हवा होता. तो माझ्यासाठी योग्य व्यक्ती नाही किंवा मी त्याच्यासाठी योग्य व्यक्ती नाही, हे तेव्हाच लक्षात यायला हवं होतं. पण तुम्हाला माहिती आहेच, पहिलं प्रेम असंच असतं. आपल्याला वाटतं, हीच व्यक्ती आहे, हाच माझ्यासाठी योग्य जोडीदार आहे. माझ्या आई-वडिलांनीही हे नातं योग्य नसल्याचं आणि आम्ही दोघंही एकमेकांसाठी योग्य जोडीदार नसल्याचं मला सांगितलं होतं. पण मी त्यांचं ऐकलं नाही”.

काम्याने सांगितलं की, हे लग्न टिकवण्यासाठी तिने खूप प्रयत्न केले. कारण नंतर मागे वळून पाहताना आपण हे नातं वाचवण्यासाठी पुरेसे प्रयत्न केले नाहीत, अशी खंत तिला राहू नये, असं तिला वाटत होतं. अभिनेत्री याबद्दल म्हणाली, “लोक मला म्हणतात, तुझी १३ वर्षे वाया गेली. पण मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न केले. या नात्याला वाचवण्यासाठी मी माझं सर्वस्व दिलं, जेणेकरून नंतर कधीही मी प्रयत्न केले नाहीत, अशी खंत मला राहू नये. मला जाणवलं होतं की, हे सगळं व्यर्थ आहे. मी कितीही प्रयत्न केले, तरी हे नातं टिकणार नव्हतं. मला त्याच्याबरोबर राहताही येत नव्हतं आणि त्या नात्यातून बाहेरही पडता येत नव्हतं. आम्ही दोघंही खूप त्रस्त आणि दुःखी होतो. काहीच सुरळीत सुरू नव्हतं, तरीही आम्ही नातं टिकवण्यासाठी प्रयत्न करत राहिलो.”

खुणा लपवण्यासाठी मी मेकअप करायचे – काम्या

अभिनेत्रीने सांगितलं की, तिला घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागला. चेहऱ्यावरील खुणा दिसू नयेत यासाठी ती मेकअप करून बाहेर पडायची. काम्या म्हणाली, “मी घरगुती हिंसाचाराचा सामना केला आहे. एक काळ असा होता की, बाहेर जाण्यापूर्वी मी चेहऱ्यावर मेकअप करायचे, जेणेकरून मारहाणीच्या खुणा दिसू नयेत.” काम्याने चेहऱ्यावरील खुणा मेकअपने लपवून एकदा पुरस्कार स्वीकारण्यासाठी गेल्याची आठवण सांगितली. त्या प्रसंगाने तिला आपण जगासमोर दाखवत असलेलं आयुष्य आणि घरात प्रत्यक्षात जे काही सहन करत आहोत, यातील विरोधाभासाची जाणीव झाली. “मला आठवतं, एकदा पुरस्कार स्वीकारण्यासाठी जाताना मला स्वतःचीच लाज वाटत होती. मी विचार करत होते, मी कोण आहे आणि हे काय करत आहे? घरी माझ्यावर मारहाण होत होती आणि त्यानंतर मी बाहेर जाऊन पुरस्कार स्वीकारत होते. का? मी कसलं आयुष्य जगत होते? मला कोणाला काही सिद्ध करायचं होतं?” असं सांगितलं.

काम्या पुढे म्हणाली, “मी स्वतःला बाथरूममध्ये कोंडून घ्यायचे आणि रडायचे. कधी-कधी संपूर्ण रात्र अशीच रडत जायची.” काम्याने एका कॉमेडी शोच्या रिहर्सलला जातानाचा प्रसंग सांगितला. चेहऱ्यावरील मारहाणीच्या खुणा दिसू नयेत यासाठी ती जास्त मेकअप करून रिहर्सलला जायची. “रिहर्सलसाठी मी इतका जास्त मेकअप का केला आहे, असा प्रश्न सगळ्यांना पडायचा. माझ्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये मी खूप रडायचे. मी २४ तास अभिनयच करत होते. माझ्यासोबत नेमकं काय घडत होतं, हे कोणालाच माहीत नव्हतं.” यावेळी तिने तिच्या एक्स पतीने तिच्या कामावरही निर्बंध आणले होते असं सांगितलं आहे.

मुलीने आई-वडिलांचं भांडण पाहिलं

काम्याने सांगितलं की, तिच्या मुलीने आई-वडिलांमधील भांडण पाहिलं आणि रडायला सुरुवात केली, तो क्षण तिच्या आयुष्यातील निर्णायक टप्पा ठरला. काम्या म्हणाली, “एक वेळ अशी आली की, माझ्या मुलीने आम्हा दोघांचं भांडण पाहिलं आणि ती रडायला लागली. तेव्हाच मी ठरवलं, असं आता चालणार नाही. मला हे नको आहे.” त्यानंतर तिने आपलं सामान घेतलं आणि घर सोडलं. काही काळ ती कारमध्ये राहिली, तर काही रात्री मित्र-मैत्रिणींच्या घरी मुक्काम केला. “मी माझी हँडबॅग घेतली, कपड्यांची एक जोडी पॅक केली आणि घराबाहेर पडले. माझ्यासाठी हा निर्णय अजिबात कठीण नव्हता. मी एकदाही रडले नाही. त्या घरातून बाहेर पडले आणि मला असं वाटलं, जणू मी मोकळेपणाने श्वास घेत आहे.” काम्याने सांगितलं की, ती साधारण एक ते दीड महिना घरापासून दूर राहिली. “माझे कपडे जवळपास एक ते दीड महिना माझ्या कारमध्येच होते, पण मी आनंदी होते. मला कोणतीही अडचण नव्हती, दुःख नव्हतं आणि वेदनाही नव्हत्या. मी मनःशांती अनुभवत होते.”

मला घटस्फोटातून काहीही नको होतं – काम्या पंजाबी

काम्याने सांगितलं की, तिने पोटगीची मागणी केली नाही. आपल्या मुलीचा सांभाळ आणि तिचा संपूर्ण खर्च स्वतःच उचलण्याची तिची तयारी होती. तसेच, ज्या कंपनीत तिने मोठी गुंतवणूक केली होती, त्यावरील हक्कही तिने सोडला. काम्या म्हणाली, “जेव्हा आमचा घटस्फोट झाला, तेव्हा मी त्याला सांगितलं, तुला जे लिहायचं आहे ते लिही आणि मी त्यावर सही करेन. मला पोटगी नको होती. मी माझ्या मुलीचा सांभाळ करेन आणि तिचा सर्व खर्चही मीच उचलेन, असं मी सांगितलं. त्याची एक कंपनी होती, ज्यामध्ये मी मोठी गुंतवणूक केली होती. पण तीही मी त्याच्या नावावर केली. मला काहीही नको होतं. मी अतिशय शांतपणे या नात्यातून बाहेर पडले.” काम्याने सांगितलं की, अनेक वर्षे सुरू असलेल्या संघर्षामुळे ती भावनिकदृष्ट्या इतकी खचली होती की एक्स पतीचा अपघात झाल्याची बातमी जेव्हा तिला पहिल्यांदा मिळाली, तेव्हा आपल्याला कोणतीही भावना जाणवत नसल्याचं पाहून तिलाच आश्चर्य वाटलं.”

“आज मला वाईट वाटतं की त्या वेळी माझ्या मनात असा विचार आला होता. पण तेव्हा माझ्याबरोबर इतकं काही घडून गेलं होतं की, मला त्यांच्याबद्दल कोणतीही काळजी किंवा चिंता वाटली नाही.” ती रुग्णालयात गेली आणि तिथेही शांतच राहिली. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी घरी परतल्यानंतर मुलीने वडिलांबद्दल विचारलं, तेव्हा आपल्या प्रतिक्रियेची तिला जाणीव झाली. “माझ्या मुलीने मला विचारलं, पप्पा कुठे आहेत? आणि अचानक मला सगळं जाणवलं. मी खूप रडले. माझ्या मनात सतत विचार येत होता, मी काय विचार करत होते? मला त्यांची काळजी का वाटत नव्हती?” काम्याने सांगितलं की, “कधीकधी मला वाटतं की, माझ्यात भावनाच उरलेल्या नाही, मी दगडासारखी झाले आहे. मी इतकं काही पाहिलं आहे की, कधीकधी आता कोणत्याही गोष्टीचा माझ्यावर परिणाम होत नाही.” दरम्यान, पहिल्या पतीपासून विभक्त झाल्यानंतर काम्याला काम्या पुन्हा प्रेमात पडली आणि तिने २०२० मध्ये शलभ डांग यांच्याशी लग्न केलं.