अनेकदा मालिकांमध्ये काम मिळवण्यासाठी कलाकारांना बऱ्याच संघर्षातून जावं लागतं. आता टीव्ही विश्वात खलनायिकांच्या भूमिकांमधून आपली ओळख निर्माण करणाऱ्या एका अभिनेत्रीने तिच्या करिअरमधील धक्कादायक अनुभव सांगितला आहे. करिअरमधील मोठी भूमिका मिळाल्यानंतर दिगदर्शकाने तिच्याबरोबर गैरवर्तन केल्याचा खुलासा तिने केला आहे. ही अभिनेत्री म्हणजे काम्य पंजाबी.
काम्या पंजाबी तिच्या व्यावसायिक आयुष्यासह खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असते. तिने पुढे सांगितलं की, तो दिग्दर्शक काही कलाकारांना खूप त्रास द्यायचा. इतकंच नाही, तर तो मुलींच्या अंतर्वस्त्रांवरही आक्षेपार्ह कमेंट्स करायचा, असा दावा अभिनेत्रीने केला.
दिग्दर्शक करायचा अश्लील कमेंट्स
काम्या पंजाबीने सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत करिअरमधील विविध अनुभवांबद्दल सांगितलं. तिने सांगितलं की, टीव्हीमध्ये मोठा ब्रेक मिळाल्यानंतर ज्या मालिकेच्या सेटवर ती काम करत होती, तिथे तिचा आत्मविश्वास पूर्णपणे ढासळला होता. तिला त्या दिग्दर्शकाची भीती वाटायची, कारण तो अतिशय घाणेरड्या आणि आक्षेपार्ह कमेंट्स करायचा. काम्या पंजाबीने ‘कहता है दिल’ या मालिकेबद्दल सांगितलं आहे. हा शो तिच्यासाठी टीव्हीवरील एक मोठा ब्रेक होता, असं तिने सांगितलं. मात्र, या मालिकेच्या सेटवरील दिग्दर्शक काही कलाकारांना खूप त्रास द्यायचा असं काम्याने सांगितलं. दिग्दर्शक ज्या पद्धतीने कलाकारांशी बोलायचा, त्यामुळे आपल्याला मेकअप रूममधून सेटवर जाण्याचीही इच्छा व्हायची नाही, असा अनुभव काम्याने सांगितला.
काम्या पंजाबीने सांगितलं, “ते दिग्दर्शक काही कलाकारांना इतकं छळायचे की, मेकअप रूममधून सेटवर जाण्याचीही इच्छा व्हायची नाही. मला शो मिळाल्याचा खूप आनंद झाला होता. मला खूप मेहनत करायची होती, पण ते हसता-खेळता अशा काही गोष्टी बोलून जायचे की, मी त्या शब्दांतही सांगू शकणार नाही. एक सीन होता, ज्यात मला पायऱ्यांवरून धावत यायचं होतं. तेव्हा त्यांनी माझ्या अंतर्वस्त्रांवरुनही अश्लील वक्तव्य केलं होतं की, कसल्या प्रकारचं घातलं आहेस? ते अशा काही गोष्टी बोलायचे की, मला खूपच संकोचल्यासारखं आणि घाबरल्यासारखं व्हायचं”.
अभिनय सोडण्याचा मिळाला होता सल्ला
काम्याने पुढे सांगितलं की, मालिकेचे २५ भाग पूर्ण झाल्यानंतर तिला रिप्लेस केलं जाणार होतं. मालिकेत लीप आल्यानंतर तिची भूमिका बदलण्यात आली. काम्या जेव्हा शो सोडत होती, तेव्हा त्या दिग्दर्शकाने तिला अभिनय सोडून ९ ते ५ ची नोकरी करण्याचा सल्ला दिला होता. अभिनय तिच्या आवाक्यातली गोष्ट नाही, असंही त्याने तिला सुनावलं होतं.
काम्या पंजाबीने दिग्दर्शकाला दिलं होतं उत्तर
काम्याने सांगितलं की, त्या दिग्दर्शकामुळे एका नवोदित अभिनेत्रीचा आत्मविश्वास पूर्णपणे ढासळला होता. तिच्या जागी दुसरी कोणी अभिनेत्री असती, तर कदाचित तिने दिग्दर्शकाच्या बोलण्याचा मनावर परिणाम करून अभिनय सोडला असता, असं काम्याने म्हटलं. मात्र, काम्याने त्या दिग्दर्शकाला एका खास पद्धतीने उत्तर दिलं. तिने सांगितलं की, जेव्हा तिला पहिला पुरस्कार मिळाला, तेव्हा तो दिग्दर्शक आपल्या असिस्टंटबरोबर प्रेक्षकांमध्ये बसला होता. काम्याने त्याच दिग्दर्शकाला तिचा पुरस्कार दाखवला होता.
