काही चित्रपट, काही भूमिका जेव्हा लोकप्रिय ठरतात, त्यावेळी कलाकार प्रसिद्धीझोतात येतात. हे कलाकार त्यांच्या विविध भूमिकांतून प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. याबरोबरच ते त्यांच्या वक्तव्यांमुळेदेखील चर्चेत असतात.

आता लोकप्रिय अभिनेत्री कनिका मान तिच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने एका मुलाखतीत ती २२ व्या वर्षी घरातून पळून आल्याचे सांगितले. ती आता नेमकं काय म्हणाली? हे जाणून घेऊ…

कनिका मानला गुड्डन तुमसे ना हो पायेगा या मालिकेतून मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली होती. त्यानंतर तिने विविध धाटणीच्या भूमिका साकारत प्रेक्षकांची मने जिंकली. खतरों के खिलाडी या शोमधूनही तिला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली. सध्या ती ‘नागिन ७’मध्ये नकारात्मक भूमिकेत दिसत आहे.

आता अभिनेत्रीने नुकतीच ‘हॉटरफ्लाई’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिच्या कुटुंबाबद्दल, लग्नाबद्दल वक्तव्य केले. ती २२ व्या वर्षांची होती तेव्हापासून तिने लग्न करावे, अशी घरच्यांची इच्छा होती. त्यामुळे तिने मोठा निर्णय घेतला होता.

अभिनेत्री म्हणाली, “मी आता ३२ वर्षांची आहे; पण सध्या लग्न करावं, असं मला वाटत नाही. जेव्हा मी २२ वर्षांची होते, तेव्हापासून मला लग्नासाठी स्थळं येत होती. मला माझं करिअर घडवायचं होतं. मात्र, माझे पालक त्याविरुद्ध होते. त्यामुळे मी घरच्यांसाठी एक चिठ्ठी लिहिली आणि घरातून पळून मुंबईला आले. मी जेव्हा १० वर्षांची होते तेव्हापासून माझ्यावर लग्नासाठी दबाव होता. माझ्या घरच्यांसाठी २२ हे लग्नासाठी योग्य वय असते.”

पुढे ती म्हणाली, “माझ्या घरच्यांना वाटते की, मी आता सुंदर दिसत आहे, तर मी लग्न केलं पाहिजे. मला लहानपणासून घरची कामं शिकवली गेली. शाळेत जा, अभ्यास करा; पण तुम्हाला हे सर्व तर करावंच लागेल. घरातील सर्व कामं प्रत्येक मुलीला आलं पाहिजे. मग ते जेवण बनवणं असो किंवा घरातील साफसफाई करणं असो, मुलींना सर्व कामं यायला हवीत. इतकंच नाही तर घरात कसं राहिलं पाहिजे हेही शिकवलं जातं. “

याच मुलाखतीत अभिनेत्रीने असाही खुलासा केला की, ती सध्या कोणाला डेट करीत नसून, कोणत्याही रिलेशनशिपमध्येसुद्धा नाही.