Amruta Bane and Shubhankar Ekbote Wedding : मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी अमृता बने आणि शुभंकर एकबोटे यांचा शाही विवाहसोहळा नुकताच पार पडला आहे. गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या लग्नाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा चालू होती. साखरपुडा, व्याही भोजन, मेहंदी, हळद असे सगळे विधी पार पडल्यावर आता अमृता-शुभंकर लग्नबंधनात अडकले आहेत. त्याच्या लग्नातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

‘कन्यादान’ मालिकेतील वृंदा आणि राणा म्हणजेच अमृता बने आणि शुभंकर एकबोटे यांनी नोव्हेंबर महिन्यात साखरपुडा उरकत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. आता या दोघांचा विवाहसोहळा पार पडला आहे. या दोघांच्या लग्नाला कलाविश्वातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा : सलमान खान गोळीबार प्रकरण : गँगस्टर लॉरेन्स व अनमोल बिश्नोई ‘वॉन्टेड आरोपी’ म्हणून घोषित

दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचं नाव मराठी कलाविश्वात अतिशय सन्मानाने घेतलं जातं. शुभंकर हा अश्विनी एकबोटेंचा लेक आहे. शुभंकरने आईच्या पावलावर पाऊल ठेवून अभिनय क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. ‘सन मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘कन्यादान’मुळे त्याची आणि अमृताची ओळख झाली. ऑनस्क्रीन नवरा-बायकोची भूमिका साकारणारी ही जोडी आता खऱ्या आयुष्यात लग्नबंधनात अडकली आहे.

हेही वाचा : अभिनेते पंकज त्रिपाठींच्या भावोजींचा रस्ते अपघातात मृत्यू, बहिणीची प्रकृती गंभीर

अमृता-शुभंकरच्या लग्नसोहळ्यात पुणेरी थाट पाहायला मिळाला. अभिनेत्रीने यावेळी गुलाबी नऊवारी साडी नेसली होती. पारंपरिक मराठमोळ्या लूकमध्ये दोघेही फारच सुंदर दिसत होते. शुभंकर पुण्याचा असल्याने त्याने त्याच्या हातावरच्या मेहंदीवर खास मुंबईचा जावई असं लिहून घेतलं आहे. सध्या कलाविश्वातून या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.

दरम्यान, अमृता आणि शुभंकरची पहिली भेट ही ‘कन्यादान’ या मालिकेच्या सेटवरच झाली होती. आता ही ऑनस्क्रीन जोडी खऱ्या आयुष्यात एकत्र आली आहे. या जोडप्याच्या लग्नातील बरेच व्हिडीओ व फोटोज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.