हल्ली सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात सर्व जण वापर करताना दिसतात. अनेक जण कामासाठीही याचा वापर करतात. मनोरंजन विश्वातीलही अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियाचा कामासाठी वापर करतात. काही त्यांच्या व्यावसायिक आयुष्यासह वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींबद्दलही यामार्फत सांगत असतात. यादरम्यान बऱ्याचदा त्यांना टीका, तुलना यांसारख्या गोष्टींचा सामना करावा लागतो. काहीवेळा फॉलोअर्स पाहूनही त्यांना काम मिळतं तर काही वेळा याचमुळे त्यांच्या हातून काम जातंसुद्धा. त्यामुळे इंडस्ट्रीत आजही असे काही कलाकार आहेत जे सोशल मीडियावर फार सक्रीय नसतात आणि सोशल मीडिया न वापरण्याला पसंती देतात. अशातच आता लोकप्रिय मराठी अभिनेत्यानेही असाच काहीसा निर्णय घेतला आहे.

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ आणि रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ यांसारख्या लोकप्रिय कलाकृतींमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांची पसंती मिळवणारा अभिनेता कपिल होणरावनेही असाच निर्णय घेतला आहे. अभिनेत्याने सोशल मीडियापासून काही काळ दूर जात असल्याचं सांगत यासंदर्भात पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. अभिनेत्याने यावेळी सतत होणारी तुलना, लाईक्स, फॉलोअर्सचा ताण यामुळे तो हा निर्णय घेत असल्याचं त्याने सांगितलं आहे.

कपिल होणरावची पोस्ट

कपिल होणरावने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत म्हटलं की, “नमस्कार सगळ्यांना, काही दिवसांसाठी सर्व सोशल मीडियापासून दूर जात आहे. वाढता स्क्रीन टाईम, लाईक्स-कमेंट्सचा ताण, इतरांच्या पोस्ट्स पाहून होणारी तुलना, रोज कमी होणारे फॉलोअर्स पाहून वाढणारा ताण आणि सतत काहीतरी पोस्ट करण्याच्या शर्यतीपासून थोडा वेळ ब्रेक घेऊन पुन्हा नवीन उर्जा घेऊन परतण्याचा निर्णय घेतला आहे”.

कपिल पुढे म्हणाला, “यावेळी अभिनय, वाचन, स्वत:वर काम करणं आणि फिटनेसकडे लक्ष देणं या गोष्टींना माझं प्राधान्य असेल. खऱ्या जगामध्ये खूप काही शिकण्यासारखं आणि जगण्यासारखं आहे. मी लवकरच परत येईन तोपर्यंत सर्वांना खूप खूप शुभेच्छा”.

दरम्यान, कपिल होणराव सोशल मीडियावर खूप सक्रीय असतो. अनेकदा त्याच्या वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्यातील अनेक घडामोडींबद्दल तो यामार्फत पोस्ट करत असतो. काही दिवसांपूर्वी तो रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ या चित्रपटातून झळकला होता. आता अभिनेता सोशल मीडियापासून काही वेळासाठी ब्रेक घेत असून लवकरच नवीन उर्जा घेऊन परतणार असल्याचं त्याने या पोस्टमधून सांगितलं आहे.