Kapil Sharma Net Worth : आपल्या विनोदी शैलीमुळे घराघरात पोहोचलेला कपिल शर्मा बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. कपिल हिंदी टेलिव्हिजनवरील मोठं नाव आहे. कपिल त्या सेलिब्रिटींपैकी एक आहे जे अभिनयाव्यतिरिक्त स्वत:चा वेगळा व्यवसायही करत आहेत.
कपिल शर्मा नेहमी कुठल्या ना कुठल्या कारणांमुळे चर्चेत असतो. आज गुरूवार २ एप्रिल रोजी त्याचा वाढदिवस आहे. अभिनेता त्याचा ४४वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्त कपिल शर्माची नेटवर्थ, त्याचं मानधन आणि व्यवसाय याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…
कपिलचा परदेशात व्यवसाय असून तो कोट्यवधींचा मालक आहे. कपिलचा कॅनडामध्ये स्वत:चा व्यवसाय आहे. तर मुंबई व पंजाबमध्येही त्याची बरीच संपत्ती आहे. शिवाय कॅनडासह दुबइतही त्याचा व्यवसाय आहे. तर अभिनेता कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक आहे.
मुंबई आणि पंजाबमध्ये आहे कोट्यवधींची संपत्ती
मुंबईतील अंधेरी येथे कपिलचं आलिशान घर आहे ज्याची किंमत १५ कोटी इतकी असल्याची म्हटलं जात आहे.याचसह त्याच्या गावी पंजाबमध्येही त्याचं स्वत:चं फार्महाऊस आहे. ‘डीएनए’च्या अहवालानुसार त्याच्या या फार्महाऊसची किंमत तब्बल २५ कोटी आहे. तो अनेकदा त्याच्या कुटुंबीयांबरोबर तिथे वेळ घालवायला जातो असंही म्हटलं जातं. यासह अभिनेत्याकडे ५.५ कोटींची एक आलिशान आणि महागडी व्हॅनिटी व्हॅनसुद्धा आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार तो ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या एका एपिसोडसाठी ५ कोटी रूपये घेतो. यासह तो जाहिराती आणि लाईव्ह शोमधूनही चांगले पैसे कमावतो. कपिल भारतातील सर्वात श्रीमंत कॉमेडियनपैकी एक आहे
कॅनडा आणि दुबईत आहेत कॅफे
कपिल आणि त्याची बायको गिन्नीनं कॅनडामधील ब्रिटिश कोलंबियामध्ये एक कॅफे सुरू केला होता. ज्याचं नाव कॅप्स कॅफे असं आहे. यानंतर त्यांनी दुबईत ३१ डिसेंबर २०२५मध्ये याच कॅफेची दुसरी शाखा सुरू केली. ‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार कपिल शर्माची नेटवर्थ ३०० कोटींहून अधिक आहे.
कपिलच्या महागड्या गाड्यांच्या कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर त्याला लक्झरी गाड्यांची खूप आवड आहे. त्याच्याकडे मर्सिडीज, रेंज रोवर इवोक, वोल्वो XC90 आणि मर्सिडीज-AMG G63 यांसारख्या महागड्या गाड्यांचं कलेक्शन आहे.
कपिलच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच तो त्याच्या ‘किस किस को प्यार करू २’ या चित्रपटात झळकलेला. यामध्ये तो मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत होता. येत्या काळात कपिल ‘दादी की शादी’ या चित्रपटात झळकणार आहे. यामध्ये रणबीर कपूरची आई नितू कपूर आणि बहीण रिद्धीमा कपूरसुद्धा झळकणार आहेत. या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झाली असून याच वर्षी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असल्याचं म्हटलं जात आहे.
