करण कुंद्रा हा छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने अनेक मालिका आणि रिअॅलिटी शोमध्ये काम केलं आहे. तो सध्या सनी लिओनीसोबत एमटीव्हीच्या स्प्लिट्सव्हिला १६ होस्ट करत आहे. करण कुंद्रा त्याच्या व्यावसायिक आयुष्याव्यतिरिक्त, वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. तो बऱ्याच काळापासून टीव्ही अभिनेत्री तेजस्वी प्रकाशला डेट करत आहे.
आता करणने सोशल मीडियावर जे प्रेम जोडपे दाखवतात, त्याबद्दल त्याचं मत व्यक्त केलं. सोशल मीडियावर दिसणारं प्रेम खरं प्रेम नसतं, असंही करणने म्हटलंय. स्क्रीनशी बोलताना करणने स्पष्ट केले की सोशल मीडिया अनेकदा प्रेमाबद्दल गोंधळ निर्माण करतं.
रिअॅलिटी शोमध्ये झालेली तेजस्वी-करणची भेट
करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांची भेट ‘बिग बॉस १५’ या रिअॅलिटी शोमध्ये झाली. याच काळात त्यांची मैत्री झाली आणि ती मैत्री प्रेमात बदलली. नात्याबद्दल करण कुंद्रा म्हणाला, “मी तेजस्वीला एका रिअॅलिटी शोमध्ये असताना भेटलो होतो. मला अशा रिअॅलिटी शोबद्दल सर्वाधिक आवडणारी गोष्ट म्हणजे तुमचे खरे रूप खूप लवकर बाहेर येते.”
“बिग बॉसच्या घरात ७-८ दिवसांत तुमच्या व्यक्तिमत्वाचे सर्व फिल्टर दूर होतात. बाहेरील जगाशी संपर्क नसतो. मग तो तुमचा मॅनेजर असो, तुमचे कुटुंब असो किंवा मित्र असो कोणीच नसतं. तुम्ही एकटे असता आणि तुम्हाला जसं वाटतं तसंच तुम्ही व्यक्त होता. कोणीही तुम्हाला निर्णय घेण्यास मदत करत नाही. त्यामुळे त्या क्षणी तुम्ही जे व्यक्त होता ते सगळं खरं असतं,” असं करण कुंद्राने नमूद केलं.
प्रेम इन्स्टाग्रामवर दिसतं तसं नसतं – करण कुंद्रा
करण कुंद्रा तेजस्वीबरोबर पाच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. आता करणने प्रेमाबद्दल व्यावहारिक गोष्टी सांगितल्या. “मी सर्वांना सांगू इच्छितो की प्रेम हे इन्स्टाग्रामवर तुम्ही जे पाहता ते नाही; ते तुम्हाला चित्रपटांमध्ये जे दाखवलं जातं किंवा तुम्ही ज्या जोडप्यांना फॉलो करता किंवा आदर्श मानता तसं प्रेम नाही, त्यापेक्षा खूप वेगळं आहे,” असं करण कुंद्रा म्हणाला.
“प्रेम खूप जास्त खरं, वास्तविक असतं. पण मला वाटतं लोक इन्स्टाग्रामवर काही गोष्टी पाहून त्यांच्या नात्यांवर दबाव आणू लागतात. पण प्रेम तसं नसतं. इन्स्टाग्रामवर दिसतात त्या आयुष्यातील फक्त लहान गोष्टी आहेत, मोठ्या नाहीत,” असं मत करण कुंद्राने व्यक्त केलं.

