Karan Kundrra Slams Trollers : करण कुंद्रा हा हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय चेहरा आहे. अभिनेत्याने आजवर हिंदी मालिकाविश्वात काम करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. करण त्याच्या व्यावसायिक आयुष्यासह खासगी आयुष्यामुळेसुद्धा चर्चेत असतो. सध्या अभिनेता लोकप्रिय अभिनेत्री तेजस्वी प्रकाशला डेट करत आहे.
करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश ‘बिग बॉस’मध्ये एकत्र झळकले होते. तिथेच त्यांचे सूर जुळले आणि तेव्हापासून ते एकमेकांसह रिलेशनशिपमध्ये आहेत. पापाराझींशी संवाद साधताना तर कधी त्यांच्या आगामी प्रोजेक्टमुळे दोघेही कुठल्या न कुठल्या कारणाने चर्चेत असतात. अशातच आता करणने नुकतीच त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक स्टोरी शेअर केली आहे.
तेजस्वीबरोबर रिलेशनशिपमध्ये येण्यापूर्वी अभिनेता प्रसिद्ध अभिनेत्री अनुषा दांडेकरला डेट करत होता. माध्यमांच्या माहितीनुसार हे दोघे साडे तीन वर्षे एकमेकांसह रिलेशनशिपमध्ये होते. परंतु, सध्या करणने तेजस्वीसाठी अनुषाला फसवलं अशा चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत. याचे काही रीलदेखील सोशल मीडियावर पाहायला मिळतात.
करणने आता इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत त्याला ट्रोल करणाऱ्यांना सुनावलं आहे. त्याने त्याच्या संदर्भातील सर्व बातम्यांचे फोटो पोस्ट करत त्यावर लिहिलं आहे की, “अजून पैसे लावा माझ्या शुभचिंतकानो, याने तुम्हाला जे साध्य करायचं आहे ते कधीच होणार नाही.”
करण आणि तेजस्वी प्रकाश ‘बिग बॉस’ सीझन १५ मध्ये एकत्र झळकले होते, तर तेजस्वी या पर्वाची विजेती ठरली होती. या सीझनमध्येच २०२१ साली त्यांच्यातील प्रेम बहरत होतं. गेली चार वर्षे हे दोघे एकमेकांसह रिलेशनशिपमध्ये आहेत. तर अनेकदा हे दोघे लग्न करणार असल्याच्या चर्चासुद्धा सुरू असतात. करण अनेकदा तेजस्वीच्या कुटुंबीयांसह उपस्थित असतो. अनेकदा तो तिच्या घरी सण, उत्सव साजरे करतानाही दिसतो.
दरम्यान, करण कुंद्राच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर करण नुकताच ‘लाफटर शेफ’ या कार्यक्रमात झळकला होता. यापूर्वी त्याने ‘बिग बॉस’मध्येही सहभाग घेतला होता. करणने आजवर हिंदीतील अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. यामधून विविध भूमिका साकारत त्याने प्रेक्षकांच्या मनात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.