कलाकार मंडळी अनेकदा मुलाखतींमार्फत, सोशल मीडियावरुन किंवा चाहत्यांशी संवाद साधताना त्यांच्या व्यावसायिक आयुष्यासह खासगी आयुष्याबद्दलही बोलताना दिसत असतात. अनेकदा त्यांच्या आयुष्यातील कठीण प्रसंगांबद्दल ते मोकळेपणाने बोलत त्यांचं भावना व्यक्त करत असतात.

अशातच आता हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेता करण वाहीने त्याच्या आयुष्यातील खडतर प्रसंगाबद्दल सांगितलं आहे. यावेळी त्याने महिलांच्या स्वातंत्र्याबद्दही भाष्य केलंय आणि आधीचे लोक समस्यांना कशा पद्धतीने सामोरे जायचे आणि आताचे लोक कसं सामोरं जातात यातील फरकाबद्दही सांगितल आहे. अभिनेत्याने छवी मित्तलसह संवाद साधताना याबद्दल सांगितलं आहे.

अभिनेता म्हणाला, “जेव्हा माझी आई कुठल्या गोष्टीमुळे त्रस्त असायची तेव्हा ती शांत राहायची आणि तिच्या पद्धतीने त्या प्रसंगाला सामोरं जायची, पण आताच्या काळातील स्त्रीया दुर्लक्ष करतात आणि मुव्ह ऑन होतात. आताच्या महिलांनी स्वातंत्र्य या गोष्टीचा वेगळाच अर्थ काढला आहे.” पुढे अभिनेत्याने त्याच्या खासगी आयुष्याबद्दल बोलताना त्याच्या डेटिंगच्या अनुभवाबद्दलही सांगतिलं आहे.

अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा

पुढे करणने त्याच्या आयुष्यातील एक प्रसंग सांगितला. तो म्हणाला की, तो एकाच वेळी अनेक मुलींना डेट करू शकत नाही, कारण त्यामुळे गोंधळ उडतो. पुढे त्याला समजलं की, तो ज्या मुलीला डेट करत होता, ती त्याचवेळी आणखी सात पुरुषांनाही डेट करत होती. याबद्दल करण म्हणाला, “मला त्यात कोण चुकीचं, कोण योग्य याबद्दल चर्चा करायची नाही, पण मग हे नेमकं कुठे थांबणार?” पुढे तो म्हणाला की, कोणाचं वागणं योग्य आहे की अयोग्य, यावर तो भाष्य करत नाही. मात्र, त्याच्या मते आजकाल महिलांमध्ये संयम कमी झाला आहे.

करण वाही ४० वर्षांचा असून त्याने अद्याप लग्न केलेलं नाही. त्याचं नाव अभिनेत्री जेनिफर विंगेटबरोबर जोडलं गेलं होतं. मात्र, करणने या अफवा फेटाळून लावत जेनिफर ही केवळ चांगली मैत्रीण असल्याचं स्पष्ट केलं होतं.

दरम्यान, करण वाहीने त्याच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात ‘रिमिक्स’ या मालिकेतून केली. त्यानंतर तो ‘दिल मिल गए’ या लोकप्रिय मालिकेत झळकला. या मालिकेमुळे त्याला घराघरात ओळख मिळाली. अभिनयाबरोबर तो सूत्रसंचालनही करतो. त्याने ‘इंडियन आयडॉल ज्युनिअर’, ‘डान्स इंडिया डान्स सुपर मॉम्स’ आणि ‘इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार्स’ यांसारख्या कार्यक्रमांचं सूत्रसंचालन केलं आहे.