Kartiki Gaikwad : मराठी चित्रपटांच्या गाण्यांप्रमाणे, गाजलेल्या सदाबहार मालिकांची शीर्षकगीतं सुद्धा कायम रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. ‘वादळवाट’, ‘आभाळमाया’, ‘फुलाला सुगंध मातीचा’, ‘पुढचं पाऊल’, ‘उंच माझा झोका’ अशा असंख्य मालिकांच्या शीर्षकगीतांनी चाहत्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर २०२० मध्ये प्रदर्शित झालेल्या अशाच एका मालिकेचं शीर्षकगीत सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. हे गीत लोकप्रिय गायिका कार्तिकी गायकवाडने गायलं आहे.

‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमामुळे कार्तिकी गायकवाड घराघरांत पोहोचली. तिने आपल्या सुमधूर आवाजाने सर्वांची मनं जिंकून घेतली आहेत. कार्तिकीने अनेक म्युझिक अल्बम व चित्रपटातील गाण्यांसाठी पार्श्वगायन केलं आहे. याशिवाय कार्तिकी गाण्यांचे लाइव्ह शोज देखील करते. प्रेक्षकांची ही आवडती गायिका नुकतीच खेड, शिवापूर याठिकाणी गेली होती. यावेळी याठिकाणी पार पडलेल्या कार्यक्रमात कार्तिकीने ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेचं शीर्षकगीत गायलं.

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका जवळपास चार वर्षे सुरू होती. या मालिकेचं मूळ शीर्षकगीत देखील कार्तिकीने गायलं आहे. हेच गाणं एका कार्यक्रमात तिने लाइव्ह सादर केलं आहे. कार्तिकी लिहिते, “सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेचं मी गायलेलं शीर्षकगीत सध्या सर्वत्र चर्चेत आलं आहे. मी हे शीर्षकगीत शिवभूमी विद्यालय, खेड शिवापूर याठिकाणी पार पडलेल्या कार्यक्रमात सादर केलं.”

रितं माप ओलांडून घरामंदी आली
लंकेची पार्वती मखरात सजली II

शालूतला मोर डोळं मिटून बसला
पोतेतला मणी हिरव्या चुड्याला हसला II
कपाळीचं कुंकू आता दैवाला पुसतं
सुख म्हणजे नक्की काय असतं !

हे शीर्षक गीत कार्तिकी गायकवाडने भर कार्यक्रमात सादर केलं. यावेळी उपस्थित प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. या व्हिडीओवर अवघ्या दोन दिवसांत ३० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

कार्तिकीने शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. तर, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेबद्दल सांगायचं झालं तर, डिसेंबर २०२४ मध्ये या मालिकेचा शेवटचा भाग ऑन एअर झाला होता. या मालिकेत अभिनेत्री गिरीजा प्रभू आणि मंदार जाधव यांच्या प्रमुख भूमिका होत्या.