Kashmira Irani Pregnant News Update: लोकप्रिय अभिनेत्री व गोविंदाची भाची कश्मीरा इराणी हिने आनंदाची बातमी दिली आहे. ‘दोस्ती यारियाँ मनमर्जियाँ’ फेम कश्मीरा ४० व्या वर्षी आई होणार आहे. काश्मीराने अडीच वर्षांपूर्वी एअरलाइन कॅप्टन असलेल्या अक्षत सक्सेनाशी लग्न केलं होतं. आता दोघेही लवकरच आपल्या पहिल्या बाळाचं स्वागत करणार आहेत.
कश्मीरा इराणीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करून यासंदर्भात माहिती दिली आहे. कश्मीराने एक फोटो शेअर केलाय. त्यात दोन शहाळी आहेत, त्यावर टॉपी व सनग्लासेस ठेवले आहेत. एका टोपीवर मॉम व एका टोपीवर डॅड लिहिलं आहे. ‘सध्याचं स्टेटस’ असं कॅप्शन देऊन ‘कमिंग सून’ असा हॅशटॅग कश्मीराने दिला आहे.
कश्मीरा इराणीची पोस्ट पाहा…
कश्मीरा इराणीच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे. गौहर खान, अंजली आनंद, जानकी मेहता, द्रष्टी धामी, कविता घई, रिद्धिमा पंडित, शर्लिन सेठी, वाहबीज दोराबजीसह अनेकांनी कश्मीरा इराणी व अक्षतचं अभिनंदन केलं आहे.
कोण आहे कश्मीरा इराणी?
कश्मीरा इराणीने मॉडेलिंगपासून आपल्या करिअरची सुरुवात केली. तिने अनेक प्रसिद्ध ब्रँड्सच्या जाहिरातींमध्ये काम केले आहे. तिला खरी ओळख टेलिव्हिजनवरील मालिकांमुळे मिळाली. कश्मीराची अंबर धारा ही पदार्पणातीलच मालिका प्रचंड गाजली. या मालिकेत तिने ‘अंबर’ नावाच्या जुळ्या बहिणींपैकी एका बहिणीची भूमिका साकारली होती. या मालिकेतील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले आणि ती घराघरांत पोहोचली. त्यानंतर ‘दोस्ती यारियाँ मनमर्जियाँ’ ही तिची मालिकाही खूप गाजली होती. तसेच कश्मीराने ‘रंगून’ आणि ‘भारत’ यांसारख्या मोठ्या बॉलीवूड चित्रपटांमध्येही महत्त्वाच्या सहाय्यक भूमिका साकारल्या आहेत.
कश्मीरा इराणीने फेब्रुवारी २०२४ मध्ये अक्षत सक्सेनाशी लग्न केलं. लग्नानंतर अडीच वर्षांनी या जोडप्याने गुड न्यूज दिली आहे. लवकरच त्यांच्या घरी चिमुकल्या सदस्याचं आगमन होणार आहे.
