Praajakta Dighe Talks About Kavita Lad : मराठी इंडस्ट्रीत असे अनेक कलाकार आहेत जे एकमेकांचे नातेवाईक आहेत. कोणी सख्ख्या बहिणी आहेत तर कोणी जाऊबाई आहेत. मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री कविता लाड आणि ‘ठरलं तर मग’मधील प्राजक्ता दिघे या दोघीसुद्धा एकमेकींच्या नातेवाईक आहेत.
‘ठरलं तर मग’ मालिकेत प्राजक्ता दिघे कल्पना सुभेदार ही भूमिका साकरत आहेत, यामुळे त्या नेहमी चर्चेत असतात. प्राजक्ता दिघे सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतात आणि त्यांच्या दैनंदिन जीवनातील घडामोडी यामार्फत त्यांच्या चाहत्यांसह शेअर करत असतात. ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांची प्रेमकहाणी सांगताना कविता लाड त्यांच्या नातेवाईक असल्याचं म्हटलं होतं. त्यावेळी त्यांनी ‘चार दिवस सासूचे’ या मालिकेदरम्यानचा किस्सासुद्धा सांगितलेला.
प्राजक्ता दिघे व कविता लाड आहेत जाऊबाई
मुलाखतीत प्राजक्ता यांनीच कविता लाड यांचं लग्न जुळवलेलं याबद्दल सांगितलेलं. महत्त्वाचं म्हणजे दोघी एकमेकींच्या जाऊबाई आहेत. मुलाखतीत कविता यांच्याबद्दल बोलताना प्राजक्ता म्हणालेल्या, “कविता लाडचा नवरा माझ्या पतीचा सख्खा चुलत आतेभाऊ आहे, मी त्याचं लग्न जमवलं.”
कविता यांच्या लग्नाबद्दल प्राजक्ता म्हणाल्या, “मी चार दिवस सासूचे मालिकेत काम करत होते, तेव्हा कविताच्या लग्नाबद्दल तिच्या घरी चर्चा सुरू होती की, घरनं म्हणतायत आता मुलं बघ वगैरे, तेव्हा मग मी तिला सांगितलं, बघ माझा दीर आहे, असा एकदम चिकना आणि सुंदर दिसतो. मग त्यांची भेट वगैरे घालून दिली, मग त्यांचं लग्न जमलं.”
कविता लाड यांच्या पतीनं आशीष यांनी प्राजक्ता व त्यांचे पती यांचं लग्न जमवण्यासाठी मदत केली होती, म्हणून ही परतफेड करण्यासाठी प्राजक्ता यांनी आशीष यांचं लग्न जमवलं. त्यावेळी कविता लाड व प्राजक्ता दिघे एकाच मालिकेत काम करत होत्या, म्हणून ‘चार दिवस सासूचे’ ही मालिका करत असतानाच कविता यांचं लग्न ठरलं आणि त्यानंतर याच मालिकेदरम्यान त्यांना मुलंसुद्धा झाली. ही मालिका अनेक वर्षे सुरू होती.
कविता लाड यांचे पती आशीष मेढेकर व प्राजक्ता दिघे यांचे पती राजन दिघे एकमेकांचे सख्खे चुलत आतेभाऊ असल्यानं दोघींची ओळख अजून घट्ट झाली आणि कविता यांच्या लग्नानंतर या दोघी एकमेकींच्या जाऊबाईसुद्धा झाल्या.
