सध्या ‘कौन बनेगा करोडपती १८’ सुरू आहे. केबीसीच्या ताज्या भागात कर्नाटकमधील बेंगळुरू येथील एक स्पर्धक २५ लाख रुपयांच्या १३ व्या प्रश्नापर्यंत पोहोचला. मात्र एका प्रश्नाचं उत्तर न आल्याने त्याने खेळ सोडला. या स्पर्धकाचं नाव कृतज्ञ नायर असून त्याने आयआयटी रुरकीमधून शिक्षण घेतलंय. कृतज्ञ नायर सोमवारी हॉटसीटवर बसला, पण त्याचा खेळ मंगळवारी सुरू झाला. तो अॅडोब कंपनीत काम करतो आणि एआय रिसर्चर असलेल्या आपल्या पत्नीबरोबर कंटेंट क्रिएटर म्हणूनही काम करतो, असं त्याने सांगितलं.
कृतज्ञने पहिल्या १२ प्रश्नांची अचूक उत्तरे दिली, पण १३ व्या प्रश्नावर तो अडकला. २५ लाख रुपयांसाठी त्याला प्रश्न विचारण्यात आला, पण तो उत्तर देऊ शकला नाही. “इस्रो शास्त्रज्ञ नंदिनी हरिनाथ यांची कोणती वस्तू स्मिथसोनियन नॅशनल एअर अँड स्पेस म्युझियममध्ये प्रदर्शित करण्यात आली आहे?” असा तो प्रश्न होता. त्यासाठी ‘A) चष्मा, B) साडी, C) डायरी, D) हँडबॅग’ हे पर्याय देण्यात आले होते.
कृतज्ञचा अंदाज खरा ठरला
कृतज्ञला खात्रीशीर उत्तर माहीत नव्हतं, त्यामुळे त्याने खेळ सोडण्याचा निर्णय घेतला आणि १२.५ लाख रुपये जिंकून त्याने शो सोडला. खेळ सोडल्यानंतर त्याला अंदाजे उत्तर देण्यास सांगण्यात आलं, तेव्हा त्याने साडी हा पर्याय निवडला, जो अगदी बरोबर होता.
नंदिनी हरिनाथ कोण आहेत?
नंदिनी हरिनाथ या भारताच्या पहिल्या मंगलयान मिशनच्या डेप्युटी ऑपरेशन्स डायरेक्टर होत्या. १ डिसेंबर २०१३ रोजी मंगलयान पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडून मंगळाच्या दिशेने निघाले, तेव्हा नंदिनी यांनी लाल आणि निळ्या रंगाची साडी नेसली होती. नंदिनी यांची ही साडी संग्रहालयाच्या ‘इंटरप्लॅनेट्री सायन्स कलेक्शन’मध्ये समाविष्ट होणारी भारतातील पहिली वस्तू ठरली. तसेच संग्रहालयात प्रदर्शित करण्यात आलेली ही पहिलीच साडी होती.
दरम्यान, कृतज्ञ हॉटसीटवर बसताच अमिताभ बच्चन म्हणाले की, त्यांना ‘जेन झी’ पिढीला भेटायला फार आवडतं, कारण ही पिढी अपयशाला घाबरत नाही आणि आयुष्याकडून जास्त अपेक्षा ठेवत नाही. इतकंच नाही तर ही पिढी योग्य परिस्थितीची वाट पाहत बसत नाही, तर मिळालेल्या संधीचा पूर्ण फायदा घेते.
कृतज्ञने अमिताभ बच्चन यांना गप्पा मारताना विचारलं की, आयुष्यात अशी कोणती गोष्ट आहे जी आपण करायला हवी होती असं तुम्हाला वाटते? यावर अमिताभ यांनी सांगितलं की, त्यांना नेहमीच एखादे संगीत वाद्य शिकायचे होते, पण त्यांना ती संधी कधीच मिळाली नाही. त्यांच्याकडे विविध वाद्यांचा संग्रह आहे, पण त्यापैकी कोणतेही वाद्य वाजवायला ते शिकले नाहीत.
