Kedar Shinde On Shriyut Gangadhar Tipre : झी मराठीवरील काही संस्मरणीय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे, ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ मालिका. आजही ही मालिका सगळ्यांच्या स्मरणात आहे. एक आदर्श आणि एकत्र कुटुंब नेमकं कसं असावं, हे या मालिकेतून उत्तमरित्या मांडण्यात आलं होतं. दिलीप प्रभावळकरांच्या अनुदिनी या संग्रहावर तयार केलेली ही मालिका आजही अजरामर आहे. कोरोना काळात झीवर ही मालिका पुन्हा दाखवण्यात आली होती.

‘श्रीयुत गंगाधर टिपरे’मध्ये दिलीप प्रभावळकर यांनी गंगाधर टिपरे यांची भूमिका साकारली होती. तर अभिनेता राजन भिसे आणि अभिनेत्री शुभांगी गोखले हे त्यांच्या मुलगा आणि सुनेच्या भूमिकेत दिसले होते. तसंच विकास कदमने त्यांच्या शिऱ्या या नातवाची भूमिका केलेली तर, रेश्मा नाईकने शलाका ही नातीची भूमिका साकारली होती. आजही प्रेक्षक या मालिकेला आणि कलाकारांना मिस करतात.

‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ या मालिकेचं दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केलं होतं. अनेकदा त्यांना या मालिकेच्या दुसऱ्या सीझनबद्दल विचारण्यात आलं आहे. अशातच नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी या मालिकेच्या दुसऱ्या सीझनचे १० एपिसोड लिहिले असल्याचं सांगितलं. याविषयी ते नेमकं काय म्हणाले? चला जाणून घेऊ…

मित्रम्हणेला दिलेल्या मुलाखतीत केदार शिंदे म्हणाले, “करोनाचा काळ संपल्यानंतर मी ‘पुन्हा टिपरे’चे १० एपिसोड लिहिले होते. पण ओटीटीवाल्यांना त्यात काही रस नव्हता. बरं त्यात जुनेच कलाकार आहेत. १० एपिसोड आता माझ्या फोनमध्ये आहेत. माझे एपिसोड प्रभावळकरांकडे वाचायला गेले. त्यांना ते आवडले म्हणून त्यांनी होकार दिला की आपण हे करूया. केवळ मी लिहिलंय म्हणून दिलीप प्रभावळकर ते करणार नव्हते. त्यांनी ती गोष्ट केली होती, त्यामुळे त्यांना दुसऱ्या भागाची भीती होती. तेव्हा मी त्यांना सांगितलं की २०२३-२४ मधले टिपरे कसे असतील? त्यांची फॅमिली काय असेल? तेव्हाची राजकीय-सामाजिक परिस्थितीबद्दल त्यांना काय वाटेल अशा आशयाने मी काही भाग लिहिले आहेत. त्यांनी एकत्र कुटुंब पद्धती सोडलेली नाही.”

यापुढे ते म्हणाले, “माझ्याकडे अजूनही ते दहा भाग आहेत. पण मला संधी मिळाली नाही. मला असं वाटतं ती वेळ येईल. ती वेळ येण्याची मी वाट बघत आहे. पण मग असं नको व्हायला की, कदाचित ती वेळ माझ्याकडे येईल पण तोपर्यंत या कलाकारांचा त्यात अभिनय करण्याचा रस निघून जाईल. आता नको करायला… आता एकदा झालं… असं व्हायला नको. मी प्रयत्न केला असं नाहीय. पण त्याची जाण असणारे लोकसुद्धा हवेत. कधीकधी असं वाटतं की, त्या स्क्रिप्टचं एक छोटंसं पुस्तक काढून मी लोकांना वाचायला द्यावं आणि प्रत्येकाने आपापलं विश्व रंगवावं.”