नवरात्री म्हणजे केवळ देवीची पूजा आणि आराधना नव्हे, तर प्रत्येक स्त्रीमध्ये असलेल्या सामर्थ्याचा उत्सव. स्वतःच्या स्वप्नांसाठी झटताना, आपल्या माणसांची काळजी घेताना आणि कठीण प्रसंगांतून मार्ग काढताना स्त्रिया आपल्यातील शक्तीची ओळख करून देतात. झी मराठीवरील ‘कमळी’ मालिकेत ‘अनिका’ ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्री केतकी कुलकर्णीने सुद्धा आपल्या आयुष्यातील अनुभवांतून स्त्रीशक्तीचा असाच अर्थ उलगडला आहे.
केतकी कुलकर्णी सांगते,“मला वाटतं की आजच्या काळात प्रत्येक मुलीने, प्रत्येक स्त्रीने सगळ्यात जास्त स्वतःवर विश्वास ठेवावा. लोक काय म्हणतात याकडे लक्ष न देता, न घाबरता पुढे चालत राहावं. सध्या माझ्या त्वचेची समस्या सुरू आहे आणि मी अजूनही त्यातून सावरण्याच्या प्रक्रियेत आहे. पण, माझा स्वत:वर विश्वास आहे. स्वतःवरचा विश्वास, हीच प्रत्येक स्त्रीची ‘स्त्रीशक्ती’ आहे, असं म्हणायला हरकत नाही.”
केतकी पुढे म्हणाली, “नवरात्रीच्या निमित्ताने आजच्या मुलींना आणि महिलांना मला हाच संदेश द्यायला आवडेल की, आपण अनेकदा शारीरिक वेदना, पीसीओडी, थायरॉईड यांसारख्या आरोग्याच्या समस्यांना सामोरं जात असतो. अशा वेळी खचून न जाता स्वतःसाठी प्रयत्न करा, स्वतःसाठी लढा आणि स्वतःची काळजी घ्या. जवळचे लोक आपल्याला सहकार्य करतात, पण शेवटी स्वतःसाठी आपल्यालाच उभं राहावं लागतं. त्यामुळे खंबीर राहा आणि मनमोकळेपणाने आयुष्य जगा. आयुष्य खूप सुंदर आहे.”
“मी खूप लहानपणापासून अभिनय क्षेत्रात काम करतेय. या प्रवासात अनेक चढ-उतार अनुभवले. प्रत्येक वेळी स्वतःला सावरून पुन्हा उभं राहणं आणि पुढे जाणं मी शिकले. अनेक गोष्टी कठीण वाटल्या, तरी स्वतःवर विश्वास ठेवून मी त्यांचा सामना केला. मला असं वाटतं की, स्त्रीने जर काही ठरवलं, तर ती काहीही करू शकते. तिच्यासाठी काहीच अशक्य नाही. माझ्या करिअरमध्ये स्वतःवर विश्वास ठेवून आजपर्यंत मी पुढे येत राहिले आणि यापुढेही अशीच वाटचाल करत राहीन. देवी आई आणि माझे बाप्पा कायम माझ्या पाठीशी आहेत, याची मला जाणीव आहे. प्रत्येक स्त्रीमध्ये एक दैवी शक्ती असते आणि त्या शक्तीच्या जोरावर ती आयुष्यात सतत पुढे जाऊ शकते, असा माझा विश्वास आहे.” असं केतकीने सांगितलं.
