Khatron Ke Khiladi 15 Gaurav Khanna Shagun Sharma Controversy: अभिनेता गौरव खन्ना मागील काही काळापासून खूप चर्चेत आहे. त्याची पत्नी आकांक्षा चमोलाने ‘लॉकअप २’मध्ये घटस्फोटाची घोषणा केली. त्यानंतर वैयक्तिक आयुष्याबद्दलही बरेच खुलासे केले. आता आणखी एका अभिनेत्रीने गौरव खन्नावर गंभीर आरोप केले आहेत. ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी २’ फेम आणि ‘खतरों के खिलाडी १५’ची स्पर्धक शगुन शर्मा हिने म्हटलंय की गौरव खन्नाने शूटिंगदरम्यान त्रास दिला. शगुनच्या मते, गौरव तिला टास्कदरम्यान टोमणे मारायचा.
‘खतरों के खिलाडी १५’ ची सुरुवात आज, १ ऑगस्टपासून कलर्स आणि जिओहॉटस्टारवर होणार आहे. शोचे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर स्पर्धकांनी अनेक मुलाखती दिल्या आहेत. अशाच एका मुलाखतीदरम्यान शगुन शर्माने आपला अनुभव सांगितला. तसेच गौरव खन्नाला आयुष्यात पुन्हा कधीचं भेटायचं नाहीये, असं ती म्हणाली.
गौरव खन्ना टार्गेट करायचा – शगुन शर्मा
“गौरवला पुन्हा कधीच भेटायला मला आवडणार नाही. त्याने मला खूप त्रास दिला. उदाहरणार्थ, जर पाच लोकांनी एखादा टास्क केला आणि त्यांपैकी चौघांनी तो मध्येच सोडून दिला, तर त्या चौघांमध्ये तो सर्वात जास्त मलाच टार्गेट करायचा. तो म्हणायचा- ‘ही तर टास्क सोडून देते’, ‘ही कमकुवत आहे’,” असं ‘फिल्मीज्ञान’शी बोलताना शगुन म्हणाली.
“मला वाटतं की रिॲलिटी शोच्या जगात माणसाचं एक वेगळंच रूप समोर येतं. त्यामुळे मी असे म्हणणार नाही की, खऱ्या आयुष्यातही तो तसाच आहे जसं तो शोमध्ये वागला,” असं शगुनने स्पष्ट केलं. दरम्यान, शगुनच्या या वक्तव्यावर गौरव खन्नाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
‘खतरों के खिलाडी १५’ मधील सर्वात मोठा ट्विस्ट
यावेळी रोहित शेट्टीने स्पर्धकांसाठी अत्यंत धोकादायक स्टंट ठेवले आहेत. प्रोमोनुसार, या सीझनच्या फॉरमॅटमध्ये एक मोठा बदल आणि ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. या शोमध्ये पहिल्यांदाच जुन्या सीझनमधील स्पर्धक पुन्हा मैदानात उतरणार असून नवीन स्पर्धकांशी स्पर्धा करताना दिसतील.
‘खतरों के खिलाडी १५’ मधील स्पर्धक
रुबीना दिलैक, जास्मिन भसीन हे या सीझनमध्ये झळकणार आहेत. त्याचबरोबर गौरव खन्ना, अविनाश मिश्रा, फरहाना भट्ट, शगुन शर्मा, अविका गोर, ओरहान अवत्रामनी म्हणजेच ओरी, हर्ष गुजराल, करण वाही, रित्विक धनजानी व विशाल आदित्य सिंह हे स्पर्धक म्हणून यंदाच्या सीझनमध्ये दिसतील.
