‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर लवकरच ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ ही नवी मालिका सुरू होणार आहे. अभिनेत्री शिवानी सुर्वे व अभिनेता समीर परांजपे या नव्या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. अलीकडेच ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ मालिकेचं सुंदर शीर्षकगीत प्रदर्शित झालं. गायिका आर्या आंबेकर व गायक नचिकेत लेले यांनी आपल्या गोड आवाजात ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ मालिकेचं शीर्षकगीत गायलं आहे. अशातच मालिकेत झळकणाऱ्या कलाकारांची आणि त्यांच्या पात्रांची ओळख व्हिडीओच्या माध्यमातून प्रेक्षकांना करून दिली जात आहे. यादरम्यानच ‘खुलता कळी खुलेना’ फेम अभिनेता ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ नव्या मालिकेत झळकणार असल्याचं समोर आलं आहे.

‘खुलता कळी खुलेना’ मालिकेत विक्रांत म्हणून झळकलेला अभिनेता ओमप्रकाश शिंदे पुन्हा एकदा ‘स्टार प्रवाह’च्या मालिकेत पाहायला मिळणार आहे. शिवानी सुर्वे, समीर परांजपे यांच्यासह ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ मालिकेत ओमप्रकाश शिंदे झळकणार आहे. ‘स्टार प्रवाह’च्या सोशल मीडियावर नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओतून याचा खुलासा झाला आहे.

हेही वाचा – ‘या’ अभिनेत्रीने सोडली ‘अबोली’ मालिका, पोस्ट करत म्हणाली, “आजपर्यंत…”

‘तुझ्या इश्काचा नाद खुळा’, ‘मुलगी झाली हो’ या ‘स्टार प्रवाह’च्या गाजलेल्या मालिकेत पाहायला मिळालेला ओमप्रकाश आता पुन्हा ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’मध्ये दिसणार आहे. या मालिकेत तो रंजितची भूमिका साकारणार आहे. आता हा रंजित कोण? या प्रश्नाचं उत्तर १७ जूनला कळणार आहे. ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ मालिका १७ जूनापासून सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा – Video: कौतुकास्पद! प्रसिद्ध गायिकेनं ३००० मुलांच्या हृदयाची शस्त्रक्रिया करून दिलं नवजीवन, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

दरम्यान, ओमप्रकाश शिंदेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्यानं नाटक, मालिका, चित्रपट, वेब सीरिज या चार माध्यमांमध्ये काम केलं आहे. याशिवाय ओमप्रकाशने मराठीसह हिंदीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. ‘अँड टीव्ही’वरील ‘एक महामानव डॉ. बी. आर आंबेडकर’ या हिंदी मालिकेत तो महात्मा ज्योतिराव फुले यांच्या भूमिकेत झळकला होता.