Vaishali Bhosale baby boy naming ceremony: अभिनेत्री खुशबू तावडे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती तिच्या व्हिडीओच्या माध्यमातून तिच्या दैनंदिन आयुष्यातील अनेक गोष्टी चाहत्यांबरोबर शेअर करते. अगदी मुलांच्या गमतीजमती, बहिणीबरोबरचे काही खास क्षण, पती संग्रामबरोबरचे काही व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करते.
खुशबू तिच्या सोशल मीडियावरील व्हिडीओमुळे कायम लक्ष वेधून घेते, ती कायम चर्चेत असते. आता नुकताच तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.
या व्हिडीओच्या सुरुवातीला खुशबूने एका लहान बाळाला हातात घेतल्याचे पाहायला मिळत आहे. एका कार्यक्रमातील हा क्षण आहे. कार्यक्रमाआधी तयार होताना नक्की कोणता कार्यक्रम आहे आणि हातात घेतलेले बाळ कोणाचे आहे, याबद्दल तिने सांगितले.
ती म्हणाली, “आज एका खास मैत्रिणीच्या बाळाच्या बारशाला मी चाललेआहे. खास यासाठी कारण ती चांगली मैत्रीण तर आहेच; पण तिच्या बाळाच्या बारशाला जाताना तिनं माझी प्रेग्नन्सी सुंदर आणि सुखकर केली होती, याची आठवण येतेय. एका मालिकेत आम्ही एकत्र काम करत होतो. तेव्हा मी गरोदर होते आणि मधेच ती मालिका सोडावी लागली. मालिका सोडताना फेअरवेल पार्टीबरोबरच तिनं माझं सुंदर डोहाळजेवणही केलं होतं. वैशाली कायमच खूप गोड मैत्रीण राहिली आहे. ती अशी मैत्रीण आहे, जी प्रत्येक ग्रुपमध्ये एक असायलाच पाहिजे.”
व्हिडीओमध्ये पुढे खुशबू वैशाली भोसलेच्या बाळाच्या बारशाला गेल्याचे दिसत आहे. वैशाली व खुशबू गप्पा मारताना दिसत आहेत. खुशबूच्या हातात बाळ असल्याचे दिसत आहे. व्हिडीओमध्ये वैशाली व तिचे पती राहुल भोसले यांची झलकही पाहायला मिळते.
हा व्हिडीओ शेअर करताना खुशबू तावडेने वैशाली भोसलेला टॅग करत लिहिले, “तुला आई होताना पाहणं म्हणजे जणू एखादी जादू प्रत्यक्ष घडताना पाहण्यासारखं आहे. तू खरंच देवाची लाडकी आहेस. या चिमुकल्या जीवासाठी देवानं तुझी खास निवड केली आहे. कारण- तुझं हृदय एवढं सगळं प्रेम सामावून घेण्याइतकं मोठं आहे, हे त्याला माहीत होतं. तू तुझ्या आयुष्यातील नवीन सुंदर गोष्टींची सुरुवात करीत आहेस हे पाहण्याची संधी मला मिळाली, यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजते. तुला आणि देवांकला खूप प्रेम”, असे म्हणत खुशबूने तिच्या भावना व्यक्त केल्या.
काही महिन्यांपूर्वी वैशाली व राहुल यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत मुलगा झाल्याच्या आनंदाची बातमी शेअर केली होती. दरम्यान, खुशबू आणि वैशाली यांनी सारं काही तिच्यासाठी या मालिकेत एकत्र काम केले होते.
