Kiran Gaikwad shares Video: एखाद्या कलाकृतीचे शूटिंग होत असताना अनेक गोष्टी घडतात. काहीवेळा त्या मजेशीर असतात, काहीवेळा त्या गंभीर असतात. पडद्यामागे काय घडते हे प्रेक्षकांना माहीत नसते. मात्र, कलाकारांच्या मुलाखतींमधून हे किस्से समोर येतात. त्यावेळी एखाद्या सीनदरम्यानची गंमत, पडद्यामागच्या गमतीजमती प्रेक्षकांना समजतात.
आता सोशल मीडियामुळे पडद्यामागे नेमके काय घडते, कलाकारांमध्ये कशी बॉण्डिंग असते, पडद्यावर दिसणारी पात्रे खऱ्या आयुष्यात कशी राहतात, सहकलाकाराबरोबर त्यांचे नाते कसे असते; अशा अनेक गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळतात. कलाकार किंवा प्रोडक्शन हाऊस सेटवरील व्हिडीओ शेअर करतात.
किरण गायकवाडने शेअर केला ‘देवमाणूस’ मालिकेच्या सेटवरील व्हिडीओ
आता अभिनेता किरण गायकवाडने एक व्हिडीओ शेअर केला आहे. देवमाणूस मधला अध्याय या मालिकेतील एका सीनच्या शूटिंगदरम्यानचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते, पोलिस गोपाळला अटक करतात तेव्हाचा हा सीन आहे. इन्स्पेक्टर मार्तंड जामकर गाडीबाहेर आहेत. एक पोलिस शिपाई आणि गोपाळ मागच्या सीटवर बसले आहेत, तर सुधाकरही गाडीबाहेर आहे; तितक्यात गाडी अचानक सुरू होते. ते पाहून तिथे असलेल्या कलाकारांची धावाधाव सुरू होते. मार्तंड जामकर गाडी थांबवण्यासाठी गाडीच्या पुढे पळत गेल्याचे दिसते. गोपाळ गाडीतून उतरतो आणि दरवाजाला ओढून गाडी थांबवण्याचा प्रयत्न करतो. इतरही लोक गाडी थांबविण्यासाठी पळतात. व्हिडीओच्या शेवटी गाडी सुस्थितीत दिसत आहे.
किरण गायकवाडने शक्तिमान हे गाणे लावले आहे आणि हसण्याच्या इमोजी शेअर केल्या आहेत. किरण गायकवाडच्या या व्हिडीओवर अनेकांनी हसण्याच्या इमोजी शेअर केल्या आहेत, तर अनेकांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.
किरण गायकवाडच्या पोस्टवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट्स
एकाने हसण्याच्या इमोजी शेअर करत लिहिले, “दरवाजा ओढून गाडी थांबवण्याचा प्रयत्न भारी होता”, दुसऱ्या एकाने लिहिले, “गोपाळला पकडायला सुधाकर भाऊ जास्त घाईत आले, गाडी सोडून दिली आणि गोपाळसुद्धा पळून जायचं तर गाडी धरत बसले.” एकाने लिहिले, “देवमाणूस बरोबर आहे, काळजी करू नका”, आणखी एकाने लिहिले, “गमंत, अशी गंमत करत असतात जामकर साहेब गोपाळ नावाचे टेलर”, एकाने लिहिले, “काळजी घ्या”, आणखी एकाने लिहिले, “सिंघममधील सीन वाटतोय”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत. काहींनी काळजी व्यक्त केली आहे, तर काहींनी मजेशीर कमेंट केल्या आहेत.








मालिकेत गोपाळ ही भूमिका किरण गायकवाडने साकारली आहे, तर मार्तंड जामकर ही भूमिका मिलिंद शिंदे यांनी साकारली आहे. सध्या मालिकेत अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत, त्यामुळे पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असल्याचे दिसते.
