scorecardresearch

“तेजू तुझं अर्ध्यावर खेळ सोडून जाणं माझ्यासाठी…” किरण मानेंचे तेजस्विनी लोणारीला पत्र

दोन मिनिटांआधी हसत खेळत होतो आपण आणि पुढच्याच क्षणाला तुला असा निरोप द्यावा लागला.

“तेजू तुझं अर्ध्यावर खेळ सोडून जाणं माझ्यासाठी…” किरण मानेंचे तेजस्विनी लोणारीला पत्र

‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. पहिल्या दिवसापासूनच घरातील सदस्यांसह प्रेक्षकांनाही आश्चर्याचे धक्के मिळत आहेत. बिग बॉसच्या घरात विजेतेपदाची दावेदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तेजस्विनी लोणारीला घराबाहेर पडावे लागले आहे. त्यामुळे तिचा ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवास संपला आहे. यानंतर आता अभिनेते किरण माने यांनी तिच्यासाठी एक पोस्ट शेअर केली आहे.

किरण माने हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. ते नेहमी फेसबुकवर विविध पोस्ट शेअर करताना दिसतात. नुकतंच किरण मानेंनी तेजस्विनी लोणारीसाठी एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी तिला एक भावूक पत्र लिहिलं आहे.
आणखी वाचा : उर्फी जावेदची श्रीमंती बॉलिवूडकरांनाही देते टक्कर, एका महिन्याची कमाई माहितीये का? 

किरण मानेंची फेसबुक पोस्ट

“प्रिय तेजू

एरवी निडर आन बेधडक बोलता येतं मला, पण आज काय बोलावं हे कळना झालंय… दोन मिनंटा आधी हासत खेळत होतो आपन, आन पुढच्याच क्षणाला तुला असा निरोप द्यावा लागल आसं खरंच वाटलं नव्हतं… या घरामधी येन्याआधी वाटलं व्हतं हा फकस्त खेळ हाय, आपण जमल तेवढं खेळायच, नाय जमलंच तर आपला मार्ग आपल्याला मोकळा हाय…. पण म्या घरात आलो, तुमच्यात राहीलो, तुमच्याशी खेळलो, भांडलो… या छोट्याश्या प्रवासात आयुष्यभर पुरतील आशी लय नाय पण थोडी थोडकी मानसं कमवली…

त्यापैकीच तू एक… या घरात सर्वांना एकत्र घेवून चालायचं म्हणजी लय अवघड काम… पण ते तू केलंस, आगदी पहिल्या दिवसा पासून ते घरातून बाहेर पडायच्या शेवटच्या क्षणापर्यंत तू ते करत होतीस… खेळ कोणताबी आसो प्रत्येक खेळ तू एखाद्या मर्दानी सारखीच खेळलीस… मनाला लागल असा एकही शब्द तुझ्या ओठी आला नाय… घरातल्या थोरा मोठ्यांना समद्याना आदरानं वागणूक दिलीस, समद्यांची काळजी घेतलीस… माझं मन मोकळं कराया, माझी समजूत काढाया, माझी हक्काची जागा तूच होतीस की…

तेजू तुझं असा अर्ध्यावर हा खेळ सोडून जानं माझ्यासाठी लय अवघड होवून बसलं हाय… घरात जे प्रेम आन आदर तू या प्रवासात कमावला, त्याच्यापेक्षा कितीतरी पट जास्त घराबाहेर आपला प्रेक्षक मायबाप, तुझ्यावर प्रचंड प्रेम आन तुझा आदर करत आसतील याची मला खात्री हाय… आता घरात पहिल्या क्रमांकाच्या पुढं तुझी पाटी नसली म्हणून काय झालं, म्या दिलेलं पहिल्या क्रमांकाच स्थान हे या प्रवासाच्या शेवटानंतर देखील तिथंच राहील… कायम…

जगात लोकं अभिनेत्यांचे, अभिनेत्रींचे, खेळाडूचे, मोठमोठ्या प्रसिद्ध मानसांचे फॅन आसत्यात… पन ह्यो किरन्या तुझ्यातल्या “मानुसकीचा” लय्य मोठा फॅन हाय.. या खेळाच्या पुढच्या प्रवासात काय होईल हे मला नाय माहीत, पन एवढं मातर छाती ठोकुन सांगू शकतो हा किरन्या… या बिग बॉसच्या घरानी, या खेळानी, आपलं म्हनावं आशी तुझ्यासारखी हक्काची आन खरीखुरी “वाघीन मैत्रिण” दिली एवढं नक्की..!,” असे किरण मानेंनी म्हटले आहे.

आणखी वाचा : “यामागे काही…” आस्ताद काळेने सांगितले उजव्या दंडावर छत्रपती शिवरायांचा टॅटू काढण्यामागचे खरे कारण

दरम्यान तेजस्विनीला टास्कदरम्यान गंभीर दुखापत झाली होती. यामुळे तिला खेळातून बाहेर पडायचं की ‘बिग बॉस’च्या घरात राहायचं, हा निर्णय तेजस्विनीला घेण्यास बिग बॉसने सांगितला होता. त्यावेळी तेजस्विनीने घरात राहून खेळ खेळण्यासाठी बिग बॉसला विनंती केली होती. परंतु, त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार निर्णय घेतला जाईल, असं बिग बॉसने सांगितलं होतं. यानंतर डॉक्टरांशी सल्ला घेतल्यानंतर तिची हाताची जखम गंभीर असल्याचे समोर आले. त्यानंतर तिला घराबाहेर पडावे लागले.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-12-2022 at 16:00 IST

संबंधित बातम्या