‘बिग बॉस मराठी’चा सहावा सीझन आता अंतिम टप्प्यात आला आहे. येत्या १९ एप्रिल रोजी ‘बिग बॉस मराठी ६’चा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. नुकतीच ‘बिग बॉस’च्या घरातून रेवा कौरासे बाहेर पडली. त्यानंतर आता ‘बिग बॉस मराठी ६’ला टॉप-५ स्पर्धक मिळाले आहेत.
रेवाची घरातून एक्झिट झाल्यानंतर तन्वी कोलते, राकेश बापट, अनुश्री माने, विशाल कोटियन आणि दिपाली सय्यद हे ‘बिग बॉस मराठी ६’चे टॉप-५ स्पर्धक बनले आहेत. त्यामुळे आता या स्पर्धकांमध्ये जिंकण्यासाठीची चुरस पाहायला मिळत आहे.
सोशल मीडियावर सध्या तन्वी कोलते आणि राकेश बापट यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. यादरम्यान अनेकजण अनुश्रीचेदेखील कौतुक करत आहेत. तिच्या चाहत्यांबरोबरच ‘बिग बॉस मराठी’चे एक्स स्पर्धकसुद्धा अनुश्रीला पाठिंबा देत आहेत. गेल्या पर्वातील धनंजय पोवारने अनुश्री पाठिंबा देणारी पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर आता किरण मानेंनीसुद्धा अनुश्री अन् विशालसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
किरण माने हे वेळोवेळी ‘बिग बॉस मराठी’च्या ६ व्या पर्वातील घडामोडींवर त्यांची मतं व्यक्त करताना दिसले. काही दिवसांपूर्वीही त्यांनी अनुश्रीचे आणि विशालचे चांगलेच कौतुक केले होते. अशातच आता त्यांनी पुन्हा एकदा दोघांसाठी पाठिंबा देणारी पोस्ट शेअर केली आहे.
या पोस्टमध्ये किरण मानेंनी म्हटलंय, “अनुश्री आणि विशाल… लव्ह यु यार… तुम्ही खूप खरे आहात. खूप छान खेळत आहात. ओढूनताणून, घाबरून, मनात नसतानाही बळजबरीने टिकवून ठेवलेल्या ‘फेक’ ग्रुपसमोर तुमचा खरेपणा लखलखून उजळला आहे. ट्रॉफी मिळो न मिळो. तुम्ही ‘मनं’ नक्कीच जिंकली आहेत. अनुश्री, माझी सातारकरीण… तुझा अभिमान आहे…” या पोस्टखालील कमेंट्समध्येसुद्धा अनेक नेटकऱ्यांनी अनुश्रीला पाठिंबा दिला आहे. यंदाच्या सीझनची तीच विजेती होईल, असंही म्हटलं आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत किरण माने अनुश्री आणि विशालचे कौतुक करत असं म्हणालेले, “मला अनुश्री मानेचा खेळ आवडत आहे. सगळ्या गेमर लोकांना ती पुरून उरत आहे. मूर्ती लहान आणि कीर्ती महान, अशी ती आहे.” अनुश्रीनंतर ते विशालबद्दल म्हणालेले, “विशाल विचारांनी खूप खंबीर आहे. समोरच्याला आपल्या तालावर नाचवून कसं खेळायचं हे त्याला बरोबर येतं. त्यामुळे बाहेर त्याची प्रतिमा नकारात्मक असली तरी तो ‘बिग बॉस’चा खेळ व्यवस्थितपणे खेळत आहे” असं म्हणाले होते.
येत्या १९ एप्रिलला कलर्स मराठीवर ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सीझनचा महाअंतिम सोहळा रंगणार आहे. आता यंदाच्या सीझनची ट्रॉफी कोण जिंकणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत.
