scorecardresearch

“माझी बदनामी…” ‘बिग बॉस’मधून बाहेर पडताच किरण मानेंचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत

“मला आत्महत्या करण्याची इच्छा झाली होती.”

“माझी बदनामी…” ‘बिग बॉस’मधून बाहेर पडताच किरण मानेंचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत
किरण माने

छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय मानल्या जाणाऱ्या ‘बिग बॉस मराठी’ च्या चौथ्या पर्वाने अखेर निरोप घेतला. अक्षय केळकर हा यंदाच्या बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता ठरला. यंदा बिग बॉसच्या घरात अक्षय केळकरच नव्हे तर अपूर्वा नेमळेकर, राखी सावंत, किरण माने, प्रसाद जवादे हे चेहरे चर्चेत राहिले. अभिनेते किरण माने हे बिग बॉसमुळे पुन्हा एकदा प्रसिद्धीझोतात आले. नुकतंच एका मुलाखतीत किरण माने यांनी “मला आत्महत्या करण्याची इच्छा झाली होती” असा खुलासा केला आहे.

अभिनेते किरण माने हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर किरण माने हे पुन्हा फेसबुकवर सक्रीय झाले आहेत. टॉप ३ स्पर्धक ठरलेल्या किरण मानेंनी टीव्ही ९ मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी बिग बॉसचा प्रवासाबरोबरच मुलगी झाली हो मालिकेबद्दलही भाष्य केले.
आणखी वाचा : “माझं आयुष्य दयनीय बनवलं…” ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्याची ‘ती’ पोस्ट चर्चेत

किरण माने काय म्हणाले?

“बिग बॉसच्या घरात १०० दिवस एका ठिकाणी थांबणे हे सोपे काम नाही. बिग बॉस हा स्क्रिप्टेड शो आहे, असं बरेचजण म्हणतात. पण ते पूर्णपणे चुकीचे आहे. बिग बॉसमध्ये तुमची शारीरिक, बौद्धिक सहनशीलता तपासली जाते. सुरुवातीला ज्यावेळी मी बिग बॉसमध्ये प्रवास सुरू केला, त्यावेळी मी बिग बॉसमध्ये पुढील २५ दिवसही टिकणार नाही. माझ्यापेक्षा निम्म्या वयाची मुलं या पर्वात सहभागी झाली होती. त्यांना चॅलेंज करणे सोपे नव्हते. पण मी प्रत्येकाचा अंदाज घेतला आणि मग पुढे सरकत गेलो.

हा शो सुरू झाल्यानंतर सुरुवातीला मी थोडा शांत होतो. अचानक कुटुंबापासून दूर होणे हे मी अनुभवत होतो. मला कधीही कोणाच्या बंधनात राहायला आवडत नाही. त्यामुळे सुरुवातीला माझी घुसमट झाली. त्यातच गेल्यावर्षी १३ जानेवारीला मुलगी झाली हो ही मालिका माझ्याकडून अन्यायकारकरित्या हिरावून घेतली गेली. या मालिकेच्या माध्यमातून खूप चुकीच्या पद्धतीने माझी बदनामी केली गेली. त्यानंतरचे सहा महिने मला खूप वाईट अनुभव आले.

एक काळ असा होता की मला आत्महत्या करण्याची इच्छा झाली होती. तो १३ जानेवारीचा दिवस होता आणि आज जानेवारी महिन्यातच बिग बॉसच्या निमित्ताने तुम्हीच हसत खेळत माझी मुलाखत घेताय. याचाच अर्थ मी त्या गोष्टीवर मात केली आहे”, असे किरण मानेंनी म्हटले.

आणखी वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातची लग्नाची तारीख समोर, म्हणाली…

दरम्यान यंदा बिग बॉसमध्ये अपूर्वा नेमळेकर, अक्षय केळकर, राखी सावंत, किरण माने आणि अमृता धोंगडे हे स्पर्धक टॉप ५ स्पर्धक ठरले. यावेळी राखी सावंत ही ९ लाख रुपये घेऊन बिग बॉसच्या स्पर्धेतून बाहेर पडली. त्यापाठोपाठ अमृता धोंगडेंनीही एक्झिट घेतली. त्यामुळे घरात फक्त अपूर्वा नेमळेकर, अक्षय केळकर आणि किरण माने हे तिघेजण टॉप ३ स्पर्धक होते. यानंतर किरण माने हे घराबाहेर पडले. त्यामुळे बिग बॉसच्या चौथ्या पर्वाचे टॉप २ सदस्य हे अपूर्वा नेमळेकर आणि अक्षय केळकर ठरले.

आता या दोघांमध्ये अक्षय केळकर हा चौथ्या पर्वाचा विजेता ठरला. त्याला बिग बॉसची ट्रॉफी आणि १५ लाख ५५ हजार रुपये बक्षिसाची रक्कम म्हणून देण्यात आली. त्याबरोबर त्याला पु.ना.गाडगीळ आणि सन्स तर्फे १० लाख रुपयांचे बंपर गिफ्ट व्हाऊचरही देण्यात आले.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-01-2023 at 18:22 IST

संबंधित बातम्या