Yed Lagala Premacha New Entry: किशोरी शहाणे यांनी आजवर अनेक चित्रपट व मालिकांमध्ये काम करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. ‘बाळाचे बाप ब्रम्हचारी’, ‘नाती’, ‘माहेरची साडी’, ‘सगळीकडे बोंबाबोंब’ असे त्यांचे अनेक चित्रपट गाजले. त्यांनी मराठीसह हिंदी चित्रपटांमध्येदेखील काम केले. हिंदी मालिकांमध्ये त्या कधी सकारात्मक तर कधी नकारात्मक भूमिका साकारत असल्याचे दिसते.

आता किशोरी शहाणे लवकरच एका मराठी मालिकेत दिसणार आहेत. एका दमदार भूमिकेतून त्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेत सतत विविध ट्विस्ट येताना दिसतात. नुकताच जीजी या पात्राने प्रेक्षकांचा निरोप घेतला. ही भूमिका अभिनेत्री नीना कुळकर्णी यांनी साकारली होती.

आता स्टार प्रवाह वाहिनीने सोशल मीडियावर ‘येडं लागलं प्रेमाचं’ या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, मंजिरी देवासमोर हात जोडून उभी आहे. त्यानंतर ती रायाचा फोटो हातात घेत म्हणते, “राया, तू कुठे आहेस?” त्यानंतर पुढे रायाचे रौद्ररुप पाहायला मिळते. त्याला बेड्या घातल्याचे पाहायला मिळत आहे. तो सोडा मला असे ओरडत असल्याचे दिसत आहे. तसेच, तो तिथे असलेल्यांना मारत असल्याचे दिसत आहे. तितक्यात एक ऑफिसर त्याच्यासमोर येऊन उभी राहते.

“तुझा आणि तिचा काहीच संबंध नाही”

ही ऑफिसर स्पेशल सेल युनिटमधील डीआयजी असून तिचे नाव इंद्रायणी धर्माधिकारी असे आहे. तिचा एक करारी बाणा, कडक स्वभाव, तीक्ष्ण नजर असल्याचे दिसत आहे. राया इंद्रायणी धर्माधिकारीला सांगतो, “मॅडम, मला मंजिरीला भेटायचं आहे.” त्यावर इंद्रायणी म्हणते, “तुझा आणि तिचा काहीच संबंध नाही.” त्यावर राया चिडून म्हणतो, “मंजिरी माझी बायको आहे.” त्यावर इंद्रायणी धर्माधिकारी त्याला स्पष्टपणे सांगते, “मंजिरी मिशनचा एक भाग होती, तू राया नाहीस. तुझी खरी ओळख विशाल भोसले आहे.” त्यानंतर राया शांत बसल्याचे दिसत आहे. दुसरीकडे मंजिरी रायाच्या फोटोकडे पाहत म्हणते, “आपला जन्मोजन्मीचा संबंध आहे.” मंजिरी दु:खात असल्याचे पाहायला मिळत आहे.

या प्रोमोवर किशोरी शहाणेंच्या मुलाने कमेंट करत मालिका पाहण्यास उत्सुक असल्याचे लिहिले आहे, तर नेटकऱ्यांनीदेखील त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. नवीन ट्विस्ट पाहण्यासाठी उत्सुक आहे असेही नेटकऱ्यांनी लिहिले आहे, तर काहींनी हार्ट इमोजी शेअर केले आहेत.

इंद्रायणी धर्माधिकारींच्या येण्याने मालिकेत नवीन ट्विस्ट आला आहे, त्यामुळे राया व मंजिरीचे नाते पुढे कसे वळण घेणार, रायाची खरी ओळख समोर आल्यानंतर काय घडणार, असे अनेक प्रश्न चाहत्यांच्या मनात आहेत.