Ankita Walawalkar New Home : आपलं हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकरचं हे स्वप्न नुकतंच पूर्ण झालं आहे. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नव्या घराची पहिली झलक अंकिताने सर्वांबरोबर शेअर केली आहे. याशिवाय ‘कोकण हार्टेड गर्ल’ने खास पोस्ट लिहित आपल्या भावना देखील व्यक्त केल्या आहेत.

अंकिता व तिचा पती कुणाल या दोघांनी मिळून पनवेलमध्ये हे नवीन घर खरेदी केलं आहे. ‘कोकण हार्टेड गर्ल’च्या नव्या घराला खूपच सुंदर अशी बाल्कनी आहे. याचठिकाणी अंकिता-कुणालने खास फोटोशूट केलं आहे.

अंकिता लिहिते, “घर घेणं… हे फक्त स्वप्न नव्हतं, ती माझी जिद्द होती. मुंबईत आले तेव्हा सिव्हिल इंजिनिअर म्हणून इतरांची घरं बांधत होते…पण मनात एकच विचार “माझं घर कधी?” मी कुठेतरी वाचलं होतं स्वप्नं नेहमी आपल्या लायकीपेक्षा मोठी बघायची. कारण लायकी आपण वाढवू शकतो…पण छोटं स्वप्न मोठं होत नाही. मला फॉलो करणाऱ्यांना माहिती असेल. मी कित्येकदा पेडर रोडवरून फेऱ्या मारायचे. अंबानींच्या Antilia समोर उभी राहायचे. त्या उंच इमारतीकडे बघायचे आणि स्टोरी टाकायचे “एक दिन मेरा भी घर होगा.” लोकांसाठी ती फक्त एक स्टोरी होती…पण माझ्यासाठी ती प्रार्थना होती. विश्वाला केलेली एक शांत हाक होती. आज विचार केला तर अंगावर शहारे येतात आणि योगायोग बघा आज ज्या टॉवरमध्ये आमचं घर आहे, त्या टॉवरचं नाव आहे “Antilia”!”

“हा योगायोग आहे? की स्वामींची इच्छा? मी जिथे नोकरी करायचे तिथले आमचे काँट्रॅक्टर पटेल गुजरातीमध्ये म्हणायचे, “Rotla male easy chhe, pan Mumbai ma ghar male mushkil chhe.” रोटी कमवणं सोपं आहे…पण मुंबईत स्वतःचं घर? खूप अवघड. त्या वाक्याने पण मी कधी घाबरले नाही…उलट ठरवलं होतं…एक दिवस मीच माझ्या घराच्या चाव्या हातात घेणार!”

“लग्नानंतर हे ‘माझं’ स्वप्न ‘आमचं’ झालं. कारण, आता घर फक्त चार भिंती नव्हत्या, ते आमचं Future होतं… आमची सुरक्षितता होती. वर्षभर आम्ही घरांच्या शोधात भटकलो. प्रत्येक घरात गेलो पण मन म्हणायचं “नाही… अजून नाही.” एक वेळ अशी आली, की स्वप्न थोडंसं शांत झालं. “कदाचित अजून वेळ आहे” असं आम्ही स्वतःलाच समजावलं आणि मग…अचानक हे घर समोर आलं. दरवाजा उघडला…आणि मन म्हणालं “हेच! ते घर” पण आकडेमोड तयार नव्हती. मन धजावत नव्हतं. भविष्याचं ओझं जड वाटत होतं. मी कुणालचा हात पकडला…आणि हसत म्हटलं “उडी मारली की पोहायला येतंच.” त्यादिवशी रात्रभर आम्हाला झोप लागली नाही. खूप भीती वाटत होती…कुणालला तर खूप जास्त भीती वाटत होती…पण मला स्वप्नावर विश्वास होता. आणि त्या दिवशी आम्ही निर्णय घेतला भीतीपेक्षा मोठं आपलं स्वप्न आहे. Risk घ्यायची हिंमत असेल, तरच मोठं स्वप्न पूर्ण होतं. आज या चाव्या हातात आहेत…आणि मनात एकच भावना या पृथ्वीवर आमची स्वतःची एक जागा आहे. छोटी असेल… पण आमची आहे आणि ती आम्ही दोघांनी उभी केली आहे. अभिमान पैशांचा नाही. अभिमान आहे त्या प्रवासाचा…जर तुम्हीही घराचं स्वप्न पाहत असाल तर लोक काय म्हणतात ते विसरा. उशीर झाला तरी चालेल…पण जिद्द जिवंत ठेवा! कारण घर जिद्दीने बांधलं जातं…त्या दिवशी मी Antilia कडे बघत होते…आज माझ्या Antilia मध्ये उभी आहे.” अशी पोस्ट शेअर करत अंकिताने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, अंकिताच्या या पोस्टवर किरण गायकवाड, मेघा धाडे, सावनी रविंद्र, योगिता चव्हाण यांसह तिच्या चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “पोरी खतरनाक तू करून दाखवलंस”, “जिद्द चिकाटी धैर्य या सगळ्या शब्दांचा अर्थ घर घेताना समजतो”, “अंकिता खूप अभिमान वाटतोय तुझा” अशा कमेंट्स करत चाहत्यांनी अंकिताला या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.