दिल्लीत २० जुलैला देशभरातील तरुणांचा आक्रोश पाहायला मिळाला. ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या मोर्चामुळे सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. NEET पेपरफुटीप्रकरणी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजनीमा द्यावा यासाठी गेल्या महिन्याभरापासून दिल्लीतील जंतरमंतरवर हे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात विद्यार्थ्यांसह त्यांचे पालक आणि काही सेलिब्रिटीही सहभागी झाले आहेत. मात्र, २० जुलै रोजी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सीजेपी (CJP) च्या ‘चलो संसद’ मोर्चादरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या झटापटीत दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज केला, यामुळे परिस्थिती आणखी बिघडली. या सगळ्या प्रकरणावर आता विविध स्तरांतून प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ‘कोकण हार्टेड गर्ल’ने याप्रकरणी पोस्ट शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

संघर्षात किंवा कोणत्याही राजकीय वादात सर्वात जास्त त्रास सामान्य माणसाला सहन करावा लागतो असं अंकिताने म्हटलं आहे. तिचा पाठिंबा विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांना, गुणवत्तेला आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक असलेल्या प्रामाणिक शिक्षणव्यवस्थेला आहे. अंकिताचा पाठिंबा कोणत्याही संघटनेला किंवा राजकीय विचारधारेला नाहीये. तसेच ती CJP म्हणजेच ‘कॉक्रोच जनता पार्टी’ला सुद्धा पाठिंबा देत नाहीये.

अंकिता लिहिते, “मला माझ्या माणसांची काळजी आहे. मला माझ्या महाराष्ट्राची काळजी आहे. मला माझ्या देशाची काळजी आहे. सध्या जे काही घडत आहे, ते भावनेपेक्षा विवेकाने पाहण्याची गरज आहे. कोणत्याही आंदोलनात, संघर्षात किंवा राजकीय वादात सर्वात जास्त त्रास सामान्य माणसालाच सहन करावा लागतो. लाठ्या सामान्य माणूस खातो, नुकसान सामान्य माणसाचं होतं. जात, धर्म, भाषा किंवा राजकीय विचारांच्या नावावर आपण एकमेकांविरुद्ध उभे राहत आहोत. पण त्याचा फायदा नेमका कोणाला होतो, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा.”

“मतभेद असू शकतात, पण मनभेद नसावेत. सोशल मीडियावरील प्रत्येक पोस्ट, व्हिडिओ किंवा अफवेवर लगेच विश्वास ठेवू नका. शांतपणे विचार करा, तथ्य पडताळा आणि मगच भूमिका घ्या. आपल्या माणसांमध्ये द्वेष नव्हे, तर विश्वास वाढवूया. आपल्या महाराष्ट्राची आणि आपल्या भारताची एकता जपूया. शांत राहूया. सजग राहूया. विचाराने वागूया. कारण शेवटी… आपण सगळे भारतीय आहोत.”

kokan hearted girl post
कोकण हार्टेड गर्लची पोस्ट

“माझा पाठिंबा हा विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांना, गुणवत्तेला आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक असलेल्या प्रामाणिक शिक्षणव्यवस्थेला आहे. कोणत्याही संघटनेला किंवा राजकीय विचारधारेला नव्हे. मी CJP ला पाठिंबा देत नाही.” असं अंकिताने स्पष्ट केलं आहे. याशिवाय रितेश-जिनिलीया यांनी देखील विद्यार्थी व तरुणांना पाठिंबा दर्शवला आहे.