Aamir Khan and Ankita Walawalkar :’कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकरने नुकतीच प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खानची भेट घेतली. पण, या भेटीमागे खूपच खास कारण होतं. आमिर खान व किरण राव यांनी २०१६ मध्ये Paani Foundation या संस्थेची स्थापना केली. महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करणं, पाणीटंचाईवर दीर्घकालीन उपाय शोधणं अशी या संस्थेची उद्दिष्टं आहेत. आता याच संस्थेसह ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकर काम करणार आहे. याबाबत सविस्तर पोस्ट शेअर करत तिने माहिती दिली आहे.

अंकिता लिहिते, “आमिर खान यांच्या विचारांमध्ये असलेली स्पष्टता आणि समाजासाठी काहीतरी अर्थपूर्ण करण्याची त्यांची जिद्द मनाला खूप भावली. आता त्यांच्या Paani Foundation सोबत मिळून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी काम करण्याची संधी मला मिळत आहे, ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी आणि अभिमानाची बाब आहे. कोकण हा निसर्गाने नटलेला प्रदेश असला तरी, याठिकाणच्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणंही तेवढंच गरजेचं आहे. अशावेळी पाणी फाउंडेशनसारख्या उपक्रमाचे कोकणात प्रथमच आगमन होणे, ही अत्यंत आनंदाची आणि सकारात्मक सुरुवात आहे.”

“या उपक्रमाच्या माध्यमातून आपण अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून, त्यांना सक्षम बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. कोकणातून सुरू झालेली ही वाटचाल महाराष्ट्रभर नवी ऊर्जा आणि आशा निर्माण करेल, असा मला विश्वास आहे.”

Award Banner

“सत्येमव जयते’ हा माझा आवडता शो होता. आमिर सरांना प्रत्यक्ष भेटल्यावर त्यांचं काम आणि व्हिजन स्पष्ट झालं. आपलं कोकण जरी निसर्गसंपन्न असलं तरी येथील आव्हानं आणि भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. आमिर सरांबरोबर मी या विषयावर चर्चा सुद्धा केली. त्यांचं उत्तर ऐकून सुद्धा छान वाटलं. थोडक्यात काय तर, कोकणातील शेतकऱ्यांचे प्रश्न सुद्धा आता ऐकले जातील आणि आपण यावर आता काम करणार आहोत. गरज आहे ती कोकणातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याची…आपण ते लवकरच करूयात!” असं अंकिताने तिच्या सर्व चाहत्यांना सांगितलं आहे.

दरम्यान, अंकिताच्या या नव्या उपक्रमाबद्दल माहिती मिळताच सोशल मीडियावर चाहत्यांकडून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. “अंकिता तुझा अभिमान आहे”, “खरंच अंकिता तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे”, “मस्त अंकिता” अशा कमेंट्स तिच्या पोस्टवर आल्या आहेत.