Kon Honaar Crorepati Host : ‘कोण होणार करोडपती’ कार्यक्रमाचा नवीन सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याचा प्रोमो आठवड्यापूर्वी लॉन्च करण्यात आला. मात्र, यंदा या शोचा होस्ट कोण असेल हे मात्र गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. यापूर्वी स्वप्नील जोशी, नागराज मंजुळे, सचिन खेडेकर या कलाकारांनी या शोचे होस्ट म्हणून जबाबदारी सांभाळली होती. मात्र, यंदाचा होस्ट वेगळा असणार आहे. फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात सहभागी झालेल्या सेलिब्रिटी पाहुण्यांना या होस्टचा चेहरा पाहून सुखद धक्का बसला आहे.
‘फिल्मफेअर पुरस्कार’ सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला अमृता फडणवीस, रेणुका शहाणे, अभिजीत सावंत, वैभव तत्त्ववादी, भरत जाधव, दिलीप प्रभावळकर असे अनेक मान्यवर उपस्थित होते. फिल्मफेअर सोहळ्याच्या निमित्ताने ‘कोण होणार करोडपती’च्या नव्या होस्टची पहिली झलक या पाहुण्यांना दाखवण्यात आली.
नव्या होस्टचं नाव समजल्यावर सगळ्याच सेलिब्रिटींना सुखद धक्का बसला. रेणुका शहाणेंचा आनंद तर गगनात मावेनासा झाला होता. अमृता फडणवीस, भरत जाधव यांच्या प्रतिक्रिया पाहून ‘कोण होणार करोडपती’ची नवीन होस्ट दुसरी तिसरी कोणीही नसून धकधक गर्ल माधुरी दीक्षित असल्याचा अंदाज नेटकऱ्यांनी वर्तवला आहे.
या प्रोमोच्या कमेंट्समध्ये काही जणांनी महेश मांजरेकर, रितेश देशमुख, प्रसाद ओक या कलाकारांची नावं घेतली आहेत. पण, जास्तीत जास्त सेलिब्रिटींनी कमेंट्समध्ये माधुरी दीक्षितचं नाव घेतलं आहे. याशिवाय या प्रोमोच्या बॅकग्राऊंडला सुद्धा धक धक म्युझिक वाजतंय. यावरून माधुरी ‘कोण होणार करोडपती’ होस्ट करतेय हे जवळपास स्पष्ट झालं आहे.
सोनी मराठी वाहिनीने अद्याप नव्या होस्टची ओळख रिव्हिल केलेली नाहीये. लवकरच याचा अधिकृत प्रोमो शेअर करण्यात येईल. आता ‘कोण होणार करोडपती’चा नवीन सीझन केव्हा सुरू होणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.
दरम्यान, माधुरीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, नुकतीच ती ‘माँ बहन’ सीरिजमध्ये झळकली. यामध्ये तिच्यासह तृप्ती डिमरी, धरना दुर्गा, रवि किशन यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या.
