Madhuri Dixit – Sonali Kulkarni : माधुरी दीक्षित होस्ट करत असलेल्या ‘कोण होणार करोडपती’ शोमध्ये दिवाळीनिमित्त अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सहभागी होणार आहे. यावेळी सेटवर खास पारंपरिक अंदाजात सोनालीचं स्वागत केलं जाईल. माधुरीने गुलाबी रंगाची सुंदर नऊवारी साडी अन् सोनालीने जांभळ्या रंगाची पैठणी नेसल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
नऊवारी साडी, नाकात नथ, गळ्यात पारंपरिक हार, केसात माळलेली गुलाबाची फुलं या लूकमध्ये माधुरी खूपच सुंदर दिसतेय. तिने यावेळी करोडपतीच्या मंचावर ढोलवादनही केलं. इतकंच नव्हे तर सोनाली अन् माधुरीच्या खास नृत्य सादरीकरणाची अन् फुगड्यांची झलकही या एपिसोडमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
माधुरीने यावेळी गप्पा मारताना सोनालीला विचारलं, “तामिळ, तेलुगू, मराठी, हिंदी…तू अगदी इटालियन सिनेमातही काम केलेलं आहेस. पण, जेव्हा तुला राग येतो…तेव्हा पहिली भाषा कोणती बोलतेस?”
यावर सोनाली म्हणाली, “अगं कारटे…हेच माझ्या तोंडात येतं. मला हार्डकोर सुद्धा म्हणावंसं वाटत नाही, इतकी मी अस्सल मराठी आहे.”
हे उत्तर ऐकून माधुरी सुद्धा खळखळून हसली आणि तिने टाळ्या वाजवून “वाह…” म्हणत सोनालीचं कौतुक केलं. सध्या हा प्रोमो सोशल मीडियावर सुद्धा तुफान व्हायरल होत आहे. ‘कुठेही गेलो तरी मनात मात्र रुजलीय मराठी…!’ असं कॅप्शन या प्रोमोवर देण्यात आलं आहे.
नेटकऱ्यांनी सुद्धा या प्रोमोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. ‘कोण होणार करोडपती’चा हा विशेष भाग ७ नोव्हेंबरला रात्री ९ वाजता सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित केला जाणार आहे.
