Krutika Deo & Abhishek Deshmukh love story : कृतिका देव व अभिषेक देशमुख मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय सेलिब्रिटी कपल आहेत. दोघेही सध्या ‘स्टार प्रवाह’वरील मालिकांमध्ये काम करत आहेत. कृतिका व अभिषेकच्या लग्नाला ८ वर्षे झाली आहेत. दोघांनीही लवकर लग्न केलं होतं. अशातच आता या जोडीने याबद्दल आणि त्यांच्या प्रेमकहाणीबद्दल सांगितलं आहे.
कृतिका व अभिषेक दोघांची भेट एका नाटकानिमित्त झालेली. त्यामुळे कामानिमित्त भेटल्यानंतर त्यांची एकमेकांशी ओळख झाली, मैत्री वाढली आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण, लहान वयात लग्न केल्यामुळे त्यांना अनेकदा याबद्दल प्रश्न विचारले जातात. अशातच आता ‘दूरदर्शन सह्याद्रीला’ दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या सगळ्याबद्दल सांगितलं आहे. या जोडीची प्रेमकहाणी कशी आहे याबद्दल जाणून घेऊयात…
कृतिका सध्या ‘लपंडाव’’ या मालिकेत मुख्य भूमिकेत आहे तर अभिषेकसुद्धा ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ या मालिकेत काम करत आहे. दोघांनी आतापर्यंत नाटक, मालिका, चित्रपट, सीरिज अशा विविध माध्यमात काम केलं आहे. त्यामुळे त्यांच्या कामाचं अनेदा कौतुक होत असतं. एरवी करिअर सेट झाल्यानंतर लग्न करुयात असं अनेक जोडपी बोलताना दिसतात. पण, या जोडीने मात्र जे काय होईल ते पुढे बघू आणि एकत्र गोष्टींना सामोरं जाऊ असं म्हणत करिअरच्या सुरुवातीच्या काळात लग्न केलं.
कशी झालेली कृतिका-अभिषेकची पहिली भेट?
मुलाखतीत अभिषेक कृतिकाबरोबरच्या पहिल्या भेटीबद्दल म्हणाला, “एका वर्क शॉपदरम्यान मी कृतिकाला पहिल्यांदा बघितलं तेव्हा मला वाटलं की गोड मुलगी आहे. तेव्हा मी नाटक लिहित होतं त्यात एक भूमिका होती त्यासाठी मी कृतिकाला विचारलं आणि त्यानंतर मी त्या नाटकाचं दिग्दर्शन केलं आणि कृतिका त्यात अभिनेत्री होती.” कृतिकाने लग्नापूर्वी अभिषेसमोर एक अट ठेवली होती.
लग्नापूर्वी कृतिकाने ठेवलेली अट
कृतिका याबद्दल म्हणाली, “मी खूप गमतीत ते म्हटलं होतं की लग्नाबद्दल विषय सुरू असताना मी गमतीत घरात श्वान असेल तरच लग्न करणार पण, मी ते नंतर विसरुन गेले होते.” अभिषेक याबद्दल म्हणाला, “मी तेव्हा ते खूप गांभीर्याने घेतलं होतं. लग्नाच्या आधी मी पाहिलं होतं की तिला प्राण्यांविषयी विशेष प्रेम आहे. मला माहीत होतं की तिला त्याची आवड आहे. म्हणून मी लग्न झाल्यानंतर तिला वाटलं की मी विसरलो पण, लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी भेट म्हणून डॅश नावाचा आता आमच्या घरी एक श्वान आहे तो दिला होता.”
लहान वयात का केलं लग्न?
अभिषेकला पुढे लग्नासाठी आणि जोडीदाराची जबाबदारी घेण्यासाठी वय खूप लहान होतं असं नाही वाटलं का असं विचारल्यानंतर तो म्हणाला, “हो वय लहान होतं. तिचं वय लहान होतं. मीसुद्धा काही फार मोठा नव्हतो. पण, तेव्हा माझे बाबा खंबीरपणे पाठिशी उभे होते. त्यांनी सांगितलेलं की तुझं सगळं तुलाच करायचं आहे पण, जर कधी वेळ आलीच तर आम्ही आहोत आणि मी आर्किटेक्ट असल्यामुळे मला आत्मविश्वास होता की आपल्याला या फिल्डमध्ये लक्षात आलं की दोन-तीन महिने काही काम नसणार आहे तर तेव्हा मी मधल्या काळात इंटिरीयर डिझाईनचे प्रोजेक्ट घेइन, मध्ये लिहिन आणि वेळ मिळेन तेव्हा ऑडिशनला जाईन. असा मी पूर्ण विचार करुन ठेवला होता. या सगळ्यात कृतिकाचा माझ्यावर खूप विश्वास होता. तिला माहीत होतं की लग्नाचा हा जो मोठा निर्णय घेतला आहे तो मी या गोष्टींचा विचार करुन घेतला आहे.”
अभिषेक याबद्दल पुढे म्हणाला, “दुसरा भाग असा होती की आम्हाला हा अनुभव घ्यायचा होता. रिस्क होतीच पण आम्ही ती घेतली. या क्षेत्रात अस्थिरता असणार आहे हे माहीत होतं. पण, आत्मविश्वास होता.” पुढे कृतिकाला तिच्या घरुन काही विरोध झाला का असं विचारल्यानंतर ती म्हणाली, “मी सामान्य कुटुंबातूनच येते. आमचं ठरलेलं होतं. एकमेकांवर विश्वास आणि आत्मविश्वास होता. मला नाही जमलं तर तू कर आणि तुला नाही जमलं तर मी करेन असा विचार होता आमचा, दोघांची मेहनत घेण्याची तयारी होती.”
…म्हणून बदलली लग्नाची तारीख
अभिषेक व कृतिका यांच्या लग्नाच्या पत्रिका छापल्यानंतर त्यांनी काही कारणामुळे लग्नाची तारीख बदलली होती. याबद्दल कृतिका म्हणाली, “आमची लग्नाची तारीख ठरली होती. ती होती १२ जानेवारी. त्याच दरम्यान मी माधुरी दीक्षितच्या पहिल्या मराठी चित्रपटासाठी बकेट लिस्टसाठी ऑडिशन दिली होती. पण, आमचं लग्न ठरलं सगळी तयारी सुरू झाली आणि अचानक मला फोन आला की ९ तारखेपासून आपण शूटिंगसाठी जाणार आहोत. म्हटलं १२ तारखेला तर लग्न ठरलं आहे पण आता कदाचित मला हा सिनेमा सोडावा लागणार आहे कारण- लग्नाचा हॉल बुक झाला होता, बाकीची तायरी सुरू होती मग मी अभिषेकला सांगितलं. तेव्हा आमच्या दोघांपुढे मोठा प्रश्न होता.”
कृतिका पुढे म्हणाली, “अभिषेकने सांगितलं की थांब आपण आईला विचारू की तिला काय वाटतंय याबद्दल तेव्हा माझ्या सासूबाईं सहजपणे आपण लग्नाची तारीख बदलूयात असं म्हणाल्या. करिअरच्यादृष्टीने चित्रपट महत्त्वाचा असल्याने लग्नाची तारीख बदलूयात असा त्यांचा दृष्टीकोण होता. मग आम्ही लग्नाची तारिख बदलली.” अभिषेक व कृतिका यांनी ६ जानेवारी २०१८मध्ये लग्नकाठ बांधली.
कृतिका पुढे म्हणाली, “लग्नाच्या दोन दिवसांनंतर मी लगेच शूटला गेले. तिथे सेटवर कोणाचा विश्वासच बसेना की खरंच लग्न झालंय का यावर. तेव्हा मी माझ्याच लग्नात मेहेंदी काढली नव्हती. कारण सिनेमात ते चालणार नव्हतं.”
