Krushna Abhishek Kashmera Shah Relation: कृष्णा अभिषेक आणि कश्मीरा शाह हे बॉलीवूडमधील लोकप्रिय सेलिब्रिटी कपल आहेत. दोघेही सध्या ‘लाफ्टर शेफ’ या शोमध्ये दिसत आहेत. कश्मीरा व कृष्णा यांनी वयात १० वर्षांचे अंतर असूनही नातं कसं टिकलं, नात्याची सुरुवात कशी झाली होती, लग्न सुरुवातीला लपवून का ठेवलं, याबाबत माहिती दिली आहे.
कृष्णा व कश्मीरा १८ वर्षांपासून एकत्र आहेत. या दोघांनी डेटिंग करायला सुरुवात केली होती, तेव्हा हे नातं टिकेल असं कुणालाच वाटलं नव्हतं. त्याबद्दल कश्मीरा ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली, “कृष्णा २२ वर्षांचा आणि मी ३२ वर्षांची असताना आम्ही भेटलो. मला वयाने लहान जोडीदार नको होता. पण आम्ही एकमेकांकडे आकर्षित झालो आणि मित्र म्हणून कनेक्ट झालो. त्यावेळी कृष्णा शोबिझमध्ये नवीन होता आणि मी आधीच सेलिब्रिटी होते, त्यामुळे अनेकांना वाटलं की मी श्रीमंत माणसासाठी कृष्णाला सोडेन. आता नाही पण कालांतराने आमच्या वयातील अंतर ब्रेकअपला कारणीभूत ठरेल असंही खूप जणांना वाटलं. पण मी आधीपासून आर्थिक बाबतीत स्वतंत्र होते आणि मला बिल भरण्यासाठी कोणाचीही गरज नव्हती.”
कश्मीराने तिच्यासारख्या महिलांविषयी समाजाचं कसं मत असतं, त्याबद्दल सांगितलं. “लोकांनी मला साधारण मुलीसारखं मानलं नाही. मी हॉट आणि सेक्सी होते आणि समाजाचं मत असं आहे की माझ्यासारख्या स्त्रियांना डेट करता येतं त्यांच्याशी लग्न करू शकत नाही. आम्ही फक्त टाइमपास करतोय, नातं टिकणार नाही, असं अनेकांना वाटलं. कृष्णाच्या वडिलांनीही आमचं नातं कधीच स्वीकारलं नाही. लग्न टिकवण्यासाठी आम्हाला अनेक अडथळे आले,” असं ती म्हणाली.
सुरुवातीला लग्नाचा विचार नव्हता – कृष्णा
जेव्हा तू तिला डेट करायला सुरुवात केलीस तेव्हा कश्मीरा तुझ्यासाठी योग्य जोडीदार आहे, याची तुला खात्री होती का? असं विचारल्यावर कृष्णा म्हणाला, “ती शाहरुख खान आणि जॅकी श्रॉफसह काम करणारी हॉट, सेक्सी आणि लोकप्रिय अभिनेत्री होती. तेव्हा मी नवखा होतो. वयातील फरक महत्त्वाचा नव्हता. त्याळी ‘बघा मी कश्मीरा शाहला डेट करतोय’ असं लोकांसमोर म्हणायला मला आवडायचं. मी तिला पहिल्यांदा जयपूरमध्ये एका चित्रपटाच्या सेटवर भेटलो, तिथे आमची ओळख झाली आणि मैत्री झाली. एके दिवशी, तिने मला तिच्या खोलीत जेवायला बोलावलं आणि आमच्या नात्याची वन-नाईट स्टँडने (हसत म्हणाला) सुरुवात झाली. सुरुवातीला, आम्ही एकमेकांबद्दल फार सिरीयस नव्हतो, आम्ही एकत्र फिरलो, वेळ घालवला. डेटिंगला सुरुवात केली तेव्हा आम्ही लग्नाचा विचार करत नव्हतो, आम्हाला वाटलं काही महिन्यात नातं संपेल. पण कश्मीरा सोबत असताना मी नेहमीच आनंदी असायचो. आम्ही एकमेकांचे चांगले मित्र आहोत,” असं कृष्णाने नमूद केलं.
मुलांना पाहायला वडील हयात नाहीत – कृष्णा
कुटुंबाने नातं स्वीकारलं नाही, त्याचा परिणाम झाला का? असं विचारल्यावर कृष्णा म्हणाला, “आम्ही १८ वर्षांपू्र्वी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होतो आणि त्या काळात ही खूप मोठी गोष्ट होती. माझ्या वडिलांना नातं मान्य नव्हतं, लोकांना वाटलं की कश्मीरा मला फसवतेय. पण सहा वर्षे एकमेकांसोबत राहिल्यानंतर मी ठरवलं की मला माझं आयुष्य स्वतःसाठी आणि माझ्या कुटुंबासाठी जगायचं आहे. लोक काय म्हणतील याने मला फरक पडत नाही. आम्ही २०१२ मध्ये लास वेगासमध्ये गुपचूप लग्न केलं. आम्हाला बाळ हवं होतं त्यामुळे आम्ही वर्षभर लग्न लपवलं. आम्हाला वाटलं गरोदरपणाची पोस्ट करून लग्न केलंय ते सर्वांना सांगू. पण तसं झालं नाही. आमची जुळी मुलं कृष्णांग आणि रायान यांचा जन्म २०१७ मध्ये झाला. आम्हाला दोन सुंदर मुलं आहेत, पण माझे वडील त्यांना पाहण्यासाठी हयात नाहीत.”