झी मराठीच्या पुरस्कार सोहळ्यात यंदा सगळ्या मालिकेतील कलाकार एकत्र येऊन खास परफॉर्मन्स सादर करणार आहेत. या खास परफॉर्मन्समध्ये ‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेतील इंदुराणी, ‘दीपज्योती’ मालिकेतील प्रीती, ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील जयंत’, ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेतील भैरवी आणि ‘कमळी’ मालिकेतील अनिका सहभागी होणार आहेत.
‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेत इंदुराणीची भूमिका साकारणारी साक्षी गांधी याबद्दल सांगते, “मी लहानपणापासून झी मराठी बघत आले आहे. कधी वाटलंही नव्हतं की, आपण एखादी मालिका करू. याआधी मी ‘झी मराठी’वर कॅमिओ केला आहे. पण यावर्षी मी ‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेत मुख्य खलनायिकेची भूमिका साकारतेय. बऱ्याचदा हे सगळं स्वप्नवत वाटतं. पण हे सगळं मायबाप रसिक प्रेक्षकांमुळे शक्य झालं आहे. त्यांचे आशीर्वाद आणि प्रेम कायम माझ्यासोबत असतं. हे माझं झी मराठी अवॉर्ड्सचं पहिलं वर्ष आहे. आम्ही खूप मज्जा केली. माझा डान्ससुद्धा होता. अशा कार्यक्रमांमध्ये सगळे कलाकार एकत्र येतात, भेटीगाठी होतात. त्यामुळे हा आपल्या घरातल्याच सोहळ्यासारखा वाटतो. संपूर्ण कुटुंब एकत्र येतं. धमाल, मज्जा आणि मस्ती असते. कोणाला पुरस्कार मिळेल, याची उत्सुकता असते. अशा अनेक गोष्टींमुळे हा सोहळा परिपूर्ण होतो. तुम्हालाही हा कार्यक्रम बघायला मज्जा येणार आहे.”
दरम्यान, ‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेबद्दल सांगायचं झालं तर, शंकर आणि जिगिशा यांच्यातील जवळीक वाढत असल्यामुळे गौरीच्या मनात शंकरला गमावण्याची भीती निर्माण होते. आपल्या मनातील भावना नाकारण्याचा प्रयत्न करत असतानाच शंकरचा दुरावा तिला अधिक अस्वस्थ करू लागलाय. तसेच, शंकर आणि जिगिशा यांचं पोस्टर पाहिल्यानंतर मातोश्री दोघांचं लग्न लावून देण्याचा निर्णय घेतात. यामुळे शंकर गौरीपासून आणखी दूर जाऊ लागतो. दसऱ्याच्या दिवशी कृष्णाई आपल्या मुलीला घेऊन, तर मातोश्री शंकरला घेऊन महालक्ष्मी मंदिरात जातात. तिथे दोघांची भेट होता होता राहते. मात्र, शंकरच्या हातून मातोश्रींनी त्याच्या पत्नीसाठी आणलेलं कुंकू गौरीच्या कपाळावर पडतं. या अनपेक्षित घटनेमुळे गौरीच्या आयुष्यात कोणतं नवं वळण येणार, याची उत्सुकता वाढणार आहे.
