Krushnaichya Leki upcoming twist: ‘कृष्णाईच्या लेकी’ या मालिकेत सतत काही ना काही घडत असल्याचे दिसते. कृष्णाई सतत कोणत्यातरी संकटात अडकते. पण, तिच्या मुली तिला आधार देतात. कृष्णाईने केलेल्या संस्कारामुळे तिच्या मुली कायमच खंबीरपणे प्रत्येक संकटाला सामोरे जातात. आता कृष्णाईच्या मदतीला कमळी येणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

झी मराठी वाहिनीवरील ‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेत कृष्णाई व तिच्या तीन मुलींची गोष्ट पाहायला मिळते. कृष्णाईची सवत इंदूराणी सतत तिला त्रास देत असते. कृष्णाईची खानावळ व तिथली जागा स्वत:च्या नावावर करून घेण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून तिचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी तिने कृष्णाईला जबरदस्तीने २० लाख रुपये दिले व त्यानंतर स्वत:च ते चोरले. त्यामुळे कृष्णाईपुढे मोठे संकट उभे राहिले आहे. त्यानंतर हे प्रकरण मातोश्रींकडे गेले. त्यांनी कृष्णाईला पाच दिवसांची मुदत दिली. त्यानंतर पंचायत भरेल असे सांगितले. गौरीला याबद्दल काहीच माहीत नाही. आता समोर आलेल्या प्रोमोमध्ये इंदूराणी पुन्हा एकदा कृष्णाईचा अपमान करणार असल्याचे पाहायला मिळत आहे.

‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेत कमळीची जबरदस्त एन्ट्री

झी मराठी वाहिनीने, सोशल मीडियावर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, पंचायत भरली आहे. इंदूराणी कृष्णाईला म्हणते, “मला झालेल्या मनस्तापाबद्दल माझ्या पायावर नाक रगडून माफी मागायची.” कृष्णाई इंदूराणीच्या पायावर डोकं ठेवण्यासाठी खाली वाकत असते, तोपर्यंत तिला “थांबा” असा आवाज येतो. हा आवाज दुसरा-तिसरा कोणाचा नसून कमळीचा आहे.

प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, कमळी एका व्यक्तीला घेऊन येते. त्याच्या चेहऱ्यावर चादर असल्यामुळे त्याचा चेहरा दिसत नाही. त्यांच्याबरोबर पोलीसही आहेत. कमळी म्हणते, “जो काही निर्णय झाला आहे, तो चुकीचा आहे.” त्यावर इंदुराणी तिचा हातात धरते आणि विचारते, “चुकीचा निर्णय ठरवणारी तू कोण?”, इंदूराणीच्या प्रश्नाचे उत्तर देत कमळी म्हणते, “कमळी. कृष्णाईची चौथी लेक.”

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “कृष्णाईच्या चौथ्या लेकीला जमलंय!”, अशी कॅप्शन दिली आहे.

दरम्यान, मालिकेत पुढे काय घडणार, इंदुराणीचे खोटे सर्वांसमोर येणार का, कमळीच्या एन्ट्रीनंतर काय पाहायला मिळणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.