‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेमुळे अभिनेत्री कृतिका तुळसकर घराघरांत लोकप्रिय झाली. या मालिकेच्या तिसऱ्या सीझनमध्ये तिने ‘शेवंता’ ही भूमिका साकारली होती. शेवंताचं पात्र घराघरांत प्रचंड गाजलं होतं. मात्र, ‘रात्रीस खेळ चाले’ मालिका संपल्यावर कृतिकाला वैयक्तिक आयुष्यात एका कठीण प्रसंगाचा सामना करावा लागला. याबद्दल तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.

कृतिका तुळसकर म्हणाली, “रात्रीस खेळ चाले’ ही मालिका संपली आणि त्यानंतर हिंदीत मी बरंच काम केलं. पुढे २०२३ मध्ये मी एका मालिकेचं शूटिंग करत होते. १८ जानेवारीचा दिवस होता…मी सकाळी उठले आणि मला वेळेत सेटवर पोहोचायचं होतं. तेव्हा मला चेहऱ्याच्या उजव्या बाजूला काहीच हालचाल जाणवत नव्हती. ब्रश केल्यावर आपण चूळ भरतो तेव्हा उजव्या बाजूने माझ्या तोंडातून पाणी बाहेर यायला लागलं. माझा उजवा डोळा सुद्धा व्यवस्थित काम करत नव्हता. माझ्या घरी मदतनीस म्हणून ज्या मावशी येतात…त्यांनी मी विचारलं की, माझ्या चेहऱ्यात काही वेगळं वाटतंय का? तेव्हा त्यांनाही डोळ्यात बदल जाणवला आणि त्या म्हणाल्या पटकन डॉक्टरकडे जा…”

अभिनेत्री पुढे म्हणते, “मी सोसायटीमधल्या डॉक्टरकडे गेले…ते बोलले उद्यापर्यंत बरी होशील, त्यांनी मला गोळ्या दिल्या. पण, मला वेगळंच काहीतरी वाटत होतं. त्यादिवशी मी माझ्या दोन मित्रांना भेटले…त्यांनाही हे सगळं वेगळं वाटलं. मग, त्यांच्या सल्ल्यानुसार मी न्यूरोलॉजिस्ट डॉक्टरला जाऊन भेटले. त्याच दिवशी संध्याकाळी मी त्या डॉक्टरांकडे गेले आणि ते मला म्हणाले, याला Bell’s palsy म्हणतात म्हणजेच चेहऱ्याचा पॅरालिसिस. मी म्हटलं ओके…आता मी बरी कशी होईन आणि कधी होईन…यावर डॉक्टर म्हणाले, ‘ते मी सांगू शकत नाही.”

कृतिका calakar_yt दिलेल्या मुलाखतीत पुढे सांगते, “तेव्हा माझ्याकडे दोन मोठे प्रोजेक्ट होते…डॉक्टरांचं सगळं ऐकल्यावर माझ्या पायाखालची जमीन सरकली होती. माझ्या हातात तेव्हा काम होतं आणि Bell’s palsy चं निदान झालं होतं. मी लगेच प्रोड्युसर सरांना फोन केला होता…त्यावेळी ते म्हणाले, ‘उद्या तुझं शूट आहे… तू सेटवरच ये’ मी सेटवर गेले त्यावेळी माझा डोळा बंदच होत नव्हता. डोळ्यात धूळ जाऊन माझा डोळा संपूर्ण लाल झाला होता. डोळ्यातून सतत पाणी येत होतं…सेटवर गेल्यावर माझा मेकअप वगैरे झाला पण, डोळ्याजवळ मेकअपच राहतच नव्हता…सतत डोळ्यातून पाणी येत होतं.”

“माझ्या चेहऱ्याची एक बाजू हलतच नव्हती. मला एका क्षणाला असं जाणवलं की, आपल्याला आता हे जमणार नाही. कारण, मला चेहऱ्यावर एक्स्प्रेशन्सच आणता येत नव्हते. मला खाता येत नव्हतं, पाणी पिता येत नव्हतं. या परिस्थितीत मी काय करू हेच मला समजत नव्हतं. तेव्हा मग निर्मात्यांशी बोलून मी काम थांबवण्याचा निर्णय घेतला. पुढच्या काही प्रोजेक्टचे माझे कॉन्ट्रॅक्ट साईन होते तेही मला सोडावे लागले. मी कधी बरी होईन…मला काहीच माहिती नव्हती. मग, मी रोज सकाळी उठायचे…रुटीन फॉलो करून डॉक्टरकडे जायचे. जवळपास तीन महिने झाले आणि यादरम्यान मी अनेक पुस्तकं वाचली, वेबसीरिज पाहिल्या. यातून मी हळुहळू सावरले. बरी झाल्यावर स्टेरॉइड्समुळे माझं वजन वाढलं होतं, केस गळत होते, स्किन खराब झाली होती…या सगळ्यातून नीट बरं व्हायला मला तीन वर्षे लागली.” असं कृतिकाने सांगितलं.