Awez Darbar-Nagma Mirajkar Breakup: बिग बॉस हिंदीमुळे चर्चेत असणारी आणि सोशल मीडियावर गाजलेली जोडी आवेज दरबार आणि नगमा मिराजकर लग्नाच्या चर्चांदरम्यान वेगळे झाले आहे. या जोडीचे ब्रेकअप झाले आहे. ही बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे, कारण या दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडायची. अभिनेत्री कुनिका सदानंदने या दोघांच्या ब्रेकअपवर शिक्कामोर्तब केलंय. तिची प्रतिक्रिया जाणून घेऊयात.
कुनिका सदानंदने ‘टेली मसाला’ला मुलाखत दिली. यावेळी तिला आवेज आणि नगमाच्या ब्रेकअपबद्दल विचारण्यात आलं, तिने या बातमीला दुजोरा दिला. “ही खूप भावनिक गोष्ट आहे, कारण माझे त्या दोघांशीही खूप चांगले संबंध होते. मी त्या दोघांवरही खूप प्रेम करते. मला माहीत आहे की, नगमा आणि आवेजने एकमेकांना खूप साथ दिली होती,” असं कुनिका सदानंद म्हणाली.
काय म्हणाली कुनिका सदानंद?
“माझी प्रार्थना करते की, ते पुन्हा एकत्र यावे किंवा काही मार्ग निघाला तर उत्तमच. पण जर तसं झालं नाही तरीही, त्या दोघांनाही आयुष्यात चांगले जोडीदार मिळो. कारण ते एकमेकांसाठी चांगले जोडीदार होतेच, पण कदाचित नशिबाला त्यांचं एकत्र राहणं लिहिलेलं नव्हतं. तरीही मला आशा आहे की त्यांना भविष्यात चांगले जोडीदार मिळतील,” असं कुनिका संदानंद म्हणाली.
आवेज आणि नगमा यांची पहिली भेट बऱ्याच वर्षांपूर्वी झाली होती. दोघेही सोशल मीडियावर स्वतंत्रपणे व्हिडीओ बनवायचे. एकदा ते एका कोलॅबोरेशनसाठी ते एकत्र आले. सुरुवातीला त्यांच्यात फक्त मैत्री होती, पण हळूहळू एकत्र व्हिडीओ बनवताना ते एकमेकांच्या प्रेमात पडले. सोशल मीडियावर त्यांची जोडी चाहत्यांना खूप आवडू लागली. त्यांच्या डान्स व्हिडीओ आणि रोमँटिक रील्समुळे ते इंटरनेटवरील सर्वात लोकप्रिय कपल्सपैकी एक बनले. नगमा आणि आवेजचे कुटुंब देखील एकमेकांच्या खूप जवळ होते. अवेजच्या बहिणींच्या लग्नात किंवा घरगुती कार्यक्रमात नगमा नेहमीच कुटुंबातील सदस्याप्रमाणे सहभागी व्हायची.
आवेजच्या वाढदिवसाला नगमा गैरहजर होती, त्यानंतर या दोघांच्या नात्यात दुरावा आल्याची चर्चा सुरू झाली. दोघांनी अद्याप एकमेकांचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावरून हटवले नाहीत, तसेच जाहीरपणेही त्यांनी ब्रेकअपबद्दल बोलणं टाळलं. पण आवेज व नगमाची बिग बॉस मधील मैत्रीण कुनिका सदानंद हिने दोघे वेगळे झाल्याची माहिती दिली.
