Bigg Boss fame Kunickaa Sadanand reacts on CM Devendra Fadnavis Statement : संततधार पावसामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील ‘मिसिंग लिंक’च्या स्लॅबवर दरड कोसळली. दोन महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या मिसिंग लिंकवरून वाहतूक पावसामुळे काही काळ बंद करण्यात आली होती. त्यामुळे विरोधकांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेत रोधकांच्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “१ कोटी खोटारडे मेल्यानंतर हे पैदा झाले” आणि “भाड्याचे टट्टू” असे शब्द वापरले होते. त्यांच्या या वक्तव्यावर बिग बॉस फेम अभिनेत्री कुनिका सदानंदने पोस्ट केली आहे.

कुनिका सदानंदने वर्षा गायकवाड यांची पोस्ट एक्सवर रिशेअर केली आहे. गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांचा अधिवेशनातील व्हिडीओ शेअर करत “लोकशाहीत सरकारला प्रश्न विचारणे म्हणजे बदनामी नाही! हजारो कोटींचा प्रकल्प फक्त दोन महिन्यात त्याच्या निकृष्ट कामाबाबत प्रश्न विचारले तर मुख्यमंत्री त्यांना भाडे के टटू म्हणतात हे निषेधार्ह आहे! माझी बदनामी करा, पण महाराष्ट्राची बदनामी केली तर सोडणार नाही, असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आधी महाराष्ट्राची बदनामी नेमकी कोण करत आहे, याचा विचार करा,”अशी पोस्ट केली होती.

तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही – कुनिका सदानंद

“जरा विचार करा, प्रश्न विचारणाऱ्या नागरिकांना एक मुख्यमंत्री ‘भाडे के टट्टू’ म्हणत आहेत. आधी आम्ही झुरळं होतो, आता हे, पुढे काय होणार? एखादा नवीन अपमान शोधून ठेवा. आणि हो सर, प्रशासनाला प्रश्न विचारणं म्हणजे महाराष्ट्राचा अपमान करणं नव्हे. तुम्ही म्हणजे काही महाराष्ट्र नाही, तुम्हाला महाराष्ट्राची काळजी घेण्यासाठी, कारभार पाहण्यासाठी निवडून दिलं आहे. दोन्हीमधला फरक समजून घ्या,” असं कुनिका सदानंदने पोस्टमध्ये लिहिलंय.

bigg-boss-fame-kunickaa-sadanand-slams-cm-eknath-shinde
अभिनेत्री कुनिका सदानंदची पोस्ट

देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य नेमके काय?

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ज्यांना गल्लीत कुत्रं विचारत नाही, ते आज सोशल मीडियावर येऊन शिव्या देत आहेत. पैसे घेऊन लिहिणाऱ्या अशा ‘भाड्याच्या टट्टूंना’ आपण सोडणार नाही. १ कोटी खोटारडे मेल्यानंतर हे पैदा झाले.” तसेच, या प्रकल्पावर भविष्यात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचेच नाव असेल, असं विधानही त्यांनी केलं.