scorecardresearch

“वडिलांच्या पानाचे पैसे मी दिले अन्…” लंडन दौऱ्यावर निघाला कुशल बद्रिके, भावूक होत म्हणाला, “पानवाल्याने माझा हात…”

लंडनला निघालेल्या कुशल बद्रिकेची भावूक पोस्ट, सांगितला ‘तो’ किस्सा

Kushal badrike Kushal badrike news
लंडनला निघालेल्या कुशल बद्रिकेची भावूक पोस्ट, सांगितला 'तो' किस्सा

झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम अल्पावधीतच लोकप्रिय ठरला. या कार्यक्रमामध्ये काम करणाऱ्या कलाकारांवर तर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. याच कार्यक्रमामुळे नावारुपाला आलेला कलाकार म्हणजे कुशल बद्रिके. कुशलने उत्तमोत्तम भूमिका साकारत त्याच्या विनोदी बुद्धीने आजवर प्रेक्षकांना खळखळून हसवलं. अगदी सामान्य कुटुंबातील कुशल मेहनत करत आजवर इथपर्यंत पोहोचला. कुशलने याचबाबत एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.

आणखी वाचा – मोठा अपघात, केईएम रुग्णालयामध्ये तीन महिने उपचार अन्…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने सांगितलेला ‘तो’ प्रसंग

कुशल आता कामानिमित्त पुन्हा एकदा लंडन दौऱ्यावर निघाला आहे. मुंबई विमानतळावरील फोटो शेअर करत त्याने एक किस्सा सांगितला. इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे पोस्ट शेअर करत असताना त्याने यामध्ये त्याच्या वडिलांचाही उल्लेख केला आहे. कुशल म्हणाला, “मी लहान असताना माझ्या वडिलांना पान खायची भारी हौस होती. १२०/३०० कत्री सुपारी पंढरपुरी तंबाखू मारके. आणि त्या पानाचे पैसे, मला माझ्या हातून द्यायची भारी हौस”.

आणखी वाचा – Video : निक जोनसवर चाहतीनं फेकलं अंतर्वस्त्र, प्रियांका चोप्रानं असं काही केलं की…; व्हिडीओ व्हायरल

“लहानपणी एकदा, असंच पप्पांच्या पानाचे पैसे ‘मी’ देत असताना त्या चौहान नावाच्या पानवाल्याने माझा हात पाहिला आणि म्हणाला “साब ये लडका बडा होके कुछ बनेगा, देखो ये ना…देस बिदेस घुमेगा!” लहानपणी, कन्नी कापलेल्या पतंगा मागे ‘उरफाटेस्तोवर’ धावणाऱ्या मला माझ्या आई-वडिलांनी कधी स्वप्नांच्यामागे ‘उरफाटेस्तोवर’ धावायला लावलं नाही. झाडाला ‘व्हलटा’ (छोटी काठी) मारून हवी असलेली ‘कैरी’ पदरात पाडून घेणाऱ्या माझ्यातही, हवी असलेली ‘स्वप्न’ पदरात पाडून घेण्याचं स्किल कधी आलं नाही”.

आणखी वाचा – “लोन, डाउन पेमेंट, खर्च अन्…” वर्षभरापूर्वी मुंबईमध्ये घर खरेदी केल्यानंतर सिद्धार्थ चांदेकरची पोस्ट, म्हणाला, “भीती होती पण…”

“जे जसं होत गेलं, तसा मी घडत गेलो, घरातून प्रामाणिकपणाची शिदोरी तेवढी मिळाली होती ती मात्र या प्रवासात कामी आली. अजूनही येते. माझ्या आई-बाबांनी, अवास्तव स्वप्न पाहून स्वतःच्या पापण्या कधी जड करुन घेतल्या नाहीत, की अपेक्षांचं ओझं माझ्या खांद्यावर टाकून माझ्या आयुष्याला कुबड आणलं नाही. म्हणून मी आता पानवाल्या चौहान साबचं बोलणं खरं करायला निघालो आहे. आज पुन्हा मी लंडनच्या प्रवासाला निघालो आहे. नशीबाच्या पानावर माझ्यासाठी काय लिहून ठेवलं आहे मला माहित नाही, पण त्यादिवशी चौहान साबने पप्पांच्या १२०/३०० पानावर माझा हा लंडन दौरा लिहिला असेल हे नक्की”. कुशलच्या या पोस्टवर तुझी मेहनत फळाला आली आहे असं चाहत्यांनी कमेंट करत म्हटलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-03-2023 at 11:06 IST

संबंधित बातम्या