Kushal Badrike Interview : मराठी मनोरंजन विश्वामध्ये ‘झी मराठी’वरील ‘चला हवा येऊ द्या’ या मालिकेने प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. कलाकारांचा अभिनय, त्यांचा विनोद व हजरजबाबीपणा यांमुळे ‘चला हवा येऊ द्या’ हा एक लोकप्रिय कार्यक्रम ठरला होता. त्यातील प्रत्येक कलाकाराला प्रेक्षकांनी अमाप प्रेम दिले. त्यातील एक लोकप्रिय विनोदी कलाकार कुशल बद्रिके याने शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांचा एक अनुभव शेअर केला आहे. राहुल यांना भाऊ कदमचा कलेवरील विनोद न आवडल्याचा किस्सा त्याने सांगितला आहे.

कुशल बद्रिकेने ‘सर्व काही’ पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीमध्ये मनोरंजन विश्वातील अनुभव सांगितले. त्यासह ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमातील आठवणी शेअर केल्या आहेत. यावेळी कुशलने शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांच्यासह घडलेला प्रसंग सांगितला. ते सेटवर आलेले असताना एका विनोदामुळे त्यांना त्यांच्या कलेचा अपमान झाल्यासारखे वाटले होते. ही परिस्थिती कुशल बद्रिकेने कशी हाताळली, याची मजेशीर आठवण त्याने सांगितली.

भाऊ कदम यांचा विनोद अन्…

कुशल बद्रिके म्हणाला, “आम्ही प्रेक्षकांमध्ये जाऊन विशिष्ट व्यक्तीची भूमिका घेऊन बसायचं आणि पाहुण्यांना प्रश्न विचारायचे, अशी नवीन विनोदाची पद्धत सुरू केली होती. त्यानंतर आमच्याकडे राहुल देशपांडे आले होते. भाऊ कदमने प्रेक्षकांमध्ये बसून प्रश्न विचारण्यासाठी हात वर केला. तर राहुलसर म्हणाले की, हो. विचारा प्रश्न. त्यावर भाऊ म्हणाला, ‘तुम्ही जे गाणं गाता, तर ते कुठल्या ना कुठल्या रागात गाता.’ तर त्यांनी ‘हो’, असे उत्तर दिले. भाऊ कदम पुढे म्हणाला, ‘एवढा कसला राग येतो तुम्हाला? रागात कशाला गायचं ना गाणं?'”

पुढे तो म्हणाला, “भाऊ कदमच्या या प्रश्नावर राहुल देशपांडे यांना कदाचित हा त्यांच्या कलेचा अपमान वगैरे होतोय का काय? असं वाटलं असावं. आम्ही आपली गंमत म्हणून करायला गेलो होतो; पण त्यांना असं वाटलं की, हा जरा चुकीचा प्रश्न आहे. त्यांचा चेहरा एकदम बदलला आणि ते एकदम धीरगंभीर झाले. त्यानंतर आमच्या सेटवर एकच शांतता पसरली. कारण- आलेल्या पाहुण्यांना विनोदातून त्यांचा अपमान झाल्यासारखं वाटलं होतं. आणि आलेले पाहुणेसुद्धा कोण, तर इतके मोठे शास्त्रीय गायक राहुल देशपांडे.”

पुढे कुशल बद्रिकेनं ही परिस्थिती कशी हाताळली याबद्दल सांगितलं. तो म्हणाला, “त्यानंतर मी हात वर केला आणि प्रश्न विचारला. मी म्हणालो, ‘सर आता माझी सटकली, मला राग येतोय, हे गाणं कोणत्या रागात गायलं आहे?’ त्यावर राहुलसर उठले आणि आम्हाला हसून म्हणाले, ‘अरे, तुम्ही धन्य आहात रे पोरं, धन्य आहात आणि ते हसायला लागले. त्यानंतर पुन्हा एकदा वातावरण निवळलं आणि शांत झालं. पुन्हा एकदा मजा सुरू झाली,”

‘मामाच्या गोव्याला जाऊया’ सिनेमा कधी होणार रिलीज?

पुढे कुशल बद्रिके म्हणाला, “त्यावेळी असा विनोद कसा सुचला? ते कसं झालं आणि काय झालं हे माहीत नाही. मला वाटतं की, ती एक दैवी वेळ असते आणि त्या वेळेला देव आपल्याला अशा गोष्टी लक्षात आणून देत असतो.” लवकरच कुशल बद्रिकेचा ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. येत्या ३१ जुलै २०२६ रोजी सिनेमा प्रदर्शित होणार आहे. विजू माने दिग्दर्शित या विनोदी सिनेमामध्ये कुशलसह अंकुश चौधरी, संतोष जुवेकर, अभिजीत चव्हाण, नेहा खान व रुचिरा जाधव यांच्या प्रमुख भूमिका आहेत.