‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या लोकप्रिय मालिकेत सविता मनसुख विराणीची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री अपरा मेहता यांनी नुकत्याच एका मुलाखतीत त्यांचे पती व अभिनेते दर्शन जरीवाला यांच्याबरोबरच्या वैवाहिक आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला.
गेल्या २० वर्षांहून अधिक काळ ते वेगळे का राहत आहेत, यामागचं कारण त्यांनी सांगितलं. तसेच त्यांच्या नात्यात कायमचा बदल घडवून आणणारा प्रसंगही त्यांनी सांगितला. हॉटरफ्लायला दिलेल्या मुलाखतीत अपरा मेहता म्हणाल्या, “मी अमेरिकेत होते. आमच्या लग्नाचा वाढदिवस होता, त्यामुळे मी तिथून दर्शनला फोन केला. तेव्हा तो म्हणाला, मला काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. मी विचार केला, नेमकं कशाबद्दल बोलायचं असेल?”.
अपरा मेहता यांनी सांगितला धक्कादायक प्रसंग
त्यानंतर भारतात परतल्यानंतर दर्शन जरीवाला यांनी त्यांच्याशी नातं संपवण्याचा निर्णय सांगितल्याचं अपरा यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या, “शो संपवून मी भारतात परतले. रात्री ३ वाजता विमानतळावर उतरले, सकाळी ५ वाजता घरी पोहोचले आणि सकाळी ७ वाजता माझं शूट होतं. त्याच वेळी तो म्हणाला, अपरा, आपण वेगळं व्हायला हवं. माझं तुझ्यावरचं प्रेम संपलं आहे. तू आता मला आवडत नाहीस आणि माझ्या आयुष्यात मी पाहिलेली तू सर्वात कुरूप स्त्री आहेस.”
“घराचे दरवाजे त्याच्यासाठी आजही खुले आहेत” – अपरा मेहता
त्या प्रसंगानंतर स्वतःला कसं सावरलं, याबद्दल सांगताना अपरा मेहता म्हणाल्या, “सकाळी तो चहाचा कप घेऊन झोपाळ्यावर बसला होता आणि मी थेट शूटिंगला निघाले. त्या दिवशी माझी तीन महत्त्वाचे सीन शूट होणार होते. मी सकाळी ५ वाजता अमेरिकेतून परतले होते, त्यामुळे शॉट्सच्या मधल्या वेळेत मला डुलकी लागत होती. दुपारी शुद्धीवर आल्यावर मी विचार केला, दर्शनने खरंच असं म्हटलं का? त्याचा तसा अर्थ नसावा.'”
पुढे त्या म्हणाल्या की, काही काळानंतर दर्शन जरीवाला यांनी घर सोडलं. मात्र, आजही दोघांमध्ये मैत्रीपूर्ण नातं कायम आहे. “एक दिवस तो घर सोडून गेला. ते आजही आमचंच घर आहे. तो गेला असला तरी त्या घराचे दरवाजे त्याच्यासाठी कायम खुले आहेत. तो परत येऊ शकतो. मात्र, तो कदाचित परत येणार नाही, हेही मला माहीत आहे. त्याला माझ्यासारखी व्यक्ती कधीच मिळणार नाही आणि मलाही त्याच्यासारखी व्यक्ती पुन्हा मिळणार नाही. आम्ही वेगळं राहत असलो तरी एकमेकांसोबत खूप कम्फर्टेबल आहोत”.
दर्शन जरीवाला यांनी ‘गांधी’, ‘माय फादर’, ‘गुरू’, ‘अजब प्रेम की गजब कहानी’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांनी १९८२ मध्ये अपरा मेहता यांच्याशी लग्न केलेलं. त्यांना एक मुलगी आहे. २००३ पासून दोघे वेगळे राहत असले तरी त्यांनी आजपर्यंत कायदेशीर घटस्फोट घेतलेला नाही.
