मनोरंजन क्षेत्र हे असं आहे जिथे रोजच्या कामाची कधीच शाश्वती देता येत नाही. एखाद्या कलाकाराकडे आज काम असेल, तर तेच काम त्याच्याकडे उद्या असेल हे सांगता येत नाही. अनेकजण इंडस्ट्रीत आपलं नाव आणि पैसा कमवण्यासाठी येत असतात. या क्षेत्रात यश, पैसा, प्रसिद्धी हे सगळं मिळालं तरी ते किती दिवस टिकून राहील हे सांगता येण्यासारखं नाही. त्यामुळे या क्षेत्रात नाव आणि प्रसिद्धी मिळाल्यानंतरही अनेक कलाकारांना कामासाठी मदत मागावी लागते.

अशीच वेळ आली आहे एका प्रसिद्ध हिंदी टीव्ही अभिनेत्रीवर. ‘क्यूकी सास भी कभी बहू थी’, ‘कहानी घर घर की’ आणि ‘जमाई राजा’ यांसारख्या अनेक गाजलेल्या मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे अचिंत कौर. टीव्ही मालिकांमध्ये आजवर नकारात्मक भूमिका साकारत तिने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. त्याच प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी तिला आता मदत मागावी लागत आहेत. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्रीला काम मिळत नाहीये. याबद्दल तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि काम देण्यासाठी मदतीचे आवाहनही केलं आहे.

अंचित कौरने तिच्या इन्स्टाग्रामवर याबद्दल एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती म्हणते, “सर्वांना नमस्कार, मला आशा आहे की, तुम्ही सर्वजण ठीक असाल. मी एक अभिनेत्री आहे आणि व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट देखील आहे. मी देशात तसेच परदेशात चांगले काम शोधत आहे. चित्रपट असो, लघुपट असो, वेबसीरिज असो… मी कोणतंही काम करण्यास तयार आहे. जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीचे कोणी कास्टिंग करत असेल तर कृपया मला कळवा.”

या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिने एक अभिनेत्री म्हणून या क्षेत्रातील चढ-उतारांना तोंड देण्याच्या महत्त्वाबद्दलही सांगितलं आहे. याबद्दल तिने असं लिहिलं आहे, “एक अभिनेत्री म्हणून आपले जीवन चढ-उतारांनी भरलेले असते. त्यामुळे मी माझ्या आयुष्यात पुढे जे काही येईल त्यासाठी तयार आहे. जर माझे काम तुमच्याशी कामाशी जुळणारं असेल, तर मला तुम्हाला सहकार्य करायला नक्कीच आवडेल”. अभिनेत्रीच्या कामाच्या मदतीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अंचित कौरचा कामासाठी मदत मागणारा हा व्हिडीओ पाहून अनेक चाहत्यांना धक्का बसला आहे. तसंच इंडस्ट्रीतील कलाकारांनीही याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं आहे. अनेकांनी तिला व्हिडीओच्या कमेंट्समध्ये पाठींबाही दिला आहे. “आम्हाला माहिती आहे की, तू तुझे शंभर टक्के देऊन काम करशील. लवकरच उत्तम गोष्टी घडतील”, “तुला हवे असलेले आणि पात्र असलेले सर्व काही मिळेल”, “लवकरच सगळं काही तुझ्या मनासारखं होईल” अशा अनेक कमेंट्सद्वारे तिला धीर दिला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अंचित कौरच्या कामाबद्दल सांगायचं झाल्यास, ती नुकत्याच ‘जमाई २.०’ या सीरिजमध्ये दुर्गा देवी म्हणून दिसली होती. ही सीरिज झी-५ वर आहे. तिने ‘घुडाचढी’ नावाच्या चित्रपटातही काम केलं आहे. शिवाय तिने ‘क्यूकी सास भी कभी बहू थी’, ‘कहानी घर घर की’ आणि ‘जमाई राजा’सारख्या गाजलेल्या मालिकांमधूनही काम केलं आहे.