Marathi Actor New Home : मुंबई किंवा पुण्यासारख्या शहरात आपलं हक्काचं घर असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण, नुकतंच एका लोकप्रिय मराठी अभिनेत्याने या दोन्ही शहरांपासून दूर साताऱ्यात आपलं ‘ड्रीम होम’ खरेदी केलं आहे. घर खरेदी केल्यावर दीड महिन्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या अभिनेत्याने ही आनंदाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.

‘लागिरं झालं जी’ या ‘झी मराठी’च्या सुपरहिट मालिकेत महत्त्वपूर्ण साकारणारे अभिनेते संतोष पाटील यांनी नुकतंच साताऱ्यात हक्काचं घर घेतलं आहे. या मालिकेत त्यांनी अज्याच्या समाधान मामाची भूमिका साकारली होती. काही दिवसांपूर्वीच संतोष पाटील यांनी नवीन गाडी खरेदी केली होती. आता हक्काच्या नव्या घरात गृहप्रवेश करत त्यांनी स्वप्नपूर्ती केली आहे.

संतोष पाटील यांनी साताऱ्यातील दौलतनगर परिसरात नवीन घर खरेदी केल्याचं व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. अभिनेते लिहितात, “२ नोव्हेंबर रोजी आम्ही गणेशपूजन केलं आणि आमच्या नव्या घरात गृहप्रवेश केला. यानिमित्ताने आमची एक इच्छापूर्ती झाली. हर्षदाने आजवर घेतलेले कष्ट आणि माझ्या स्वप्नांना स्वत:ची साथ देत या घराच्या रुपी एक सावली मिळवली. अनेक वर्षे सातत्याने प्रयत्न केले. ध्रुवी, हर्षदा आणि आई तुम्ही खूप-खूप कष्टांत दिवस काढले, कदाचित हे त्यामुळेच शक्य झालं”

संतोष पाटील यांनी आपल्या पत्नी अन् कुटुंबीयांसह नव्या घरात गृहप्रवेश पूजा केल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. नेटकऱ्यांनी या पोस्टवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

दरम्यान, संतोष पाटील यांनी ‘लागिरं झालं जी’ या मालिकेसह ‘अप्पी आमची कलेक्टर’, ‘साता जल्माच्या गाठी’, ‘मुलगी झाली हो’, ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकांमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.