Tejashri Pradhan Birthday : मराठी सिनेमा असो किंवा मालिका…जिने आपल्या निखळ हास्याने अन् सहजसुंदर अभिनयाने सर्वांची मनं जिंकून घेतली अशा तेजश्री प्रधानचा आज ३८ वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने संपूर्ण मराठी कलाविश्वातून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. तेजश्री सध्या ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारतेय. मात्र, वाढदिवसानिमित्त ती खास नैनिताल फिरायला गेली आहे.
तेजश्री प्रधानसाठी आज तिच्या वाढदिवसानिमित्त ‘लागिरं झालं जी’ फेम अभिनेत्री शिवानी बावकरने खास पोस्ट लिहिली आहे. शिवानी आणि तेजश्री या दोघीही एकमेकींच्या घट्ट मैत्रिणी आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांची खूप छान मैत्री आहे.
शिवानी लाडक्या मैत्रिणीला शुभेच्छा देत लिहिते, “वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा तेजश्री! आपण जेव्हा भेटतो तेव्हा एकमेकींशी भरपूर गप्पा मारतो…आयुष्यात कितीही व्यग्र असलो तरीही पुन्हा एकमेकांकडे परत येतो…अजून काय हवं? मी खूप लकी आहे कारण, माझ्या आयुष्यातील लहानसहान गोष्टी लक्षात ठेवणारी एक खास व्यक्ती माझ्याकडे आहे. आयुष्यातील चांगले क्षण, कठीण दिवस…माझ्या आयुष्यातील निराशजनक काळ…अगदी माझं वजन कमी झालं/वाढलं या क्षुल्लक गोष्टीसुद्धा तुझ्या लक्षात असतात. माझ्यावर तू इतका विश्वास दाखवतेस खूप थँक्यू!”
“मला आपल्या मैत्रीत सर्वात आवडणारी गोष्ट म्हणजे आपण कायम एकमेकांना आधार देतो. कायम आपण एकमेकांच्या यशाचा आनंद साजरा करतो…कठीण काळात एकमेकांचं ऐकून घेतो. आयुष्यातील प्रत्येक चढउतारांमध्ये एकमेकांशी जोडून राहतो…मला आशा आहे की, या वर्षात तुझ्या आयुष्यात भरभरून आनंद येईल. उत्तम आरोग्य, मन:शांती आणि तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊदेत. तुला खूप प्रेम आणि पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा…तू माझ्या आयुष्यात आहेस, हे माझं भाग्य आहे.” अशी पोस्ट शेअर करत शिवानीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
शिवानीची ही गोड पोस्ट वाचून तेजश्री म्हणते, “मी काय बोलू आता? किती सुंदर पोस्ट आहे. लव्ह यू More…अशीच कायम माझ्याबरोबर राहा”
दरम्यान, शिवानीने शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. तसेच या दोघींच्या मैत्रीचं भरभरून कौतुक केलं आहे. “क्युट पोस्ट”, “दोघींना नजर नको लागूदेत” अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी या पोस्टवर दिल्या आहे.
