‘लागिरं झालं जी’ ही मालिका संपून आता जवळपास सहा वर्षे उलटली आहेत. मात्र, आजही या मालिकेची लोकप्रियता कायम आहे. यामधील प्रत्येक पात्र घराघरांत लोकप्रिय झालं होतं. अभिनेत्री विद्या सावळे यांनी या मालिकेत ‘पुष्मा मामी’ ही भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड गाजली. आज विद्या सावळेंच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मुलींनी खास पोस्ट शेअर केली आहे.

विद्या सावळे यांना जुळ्या मुली आहेत. आईच्या पावलांवर पाऊल ठेवत विद्या यांच्या दोन्ही मुलींनी काही वर्षांपूर्वी इंडस्ट्रीत पदार्पण केलं. या दोघींची नावं आहेत नेहा आणि निकिता. यापैकी नेहाने यापूर्वी ‘कलर्स मराठी’च्या ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेत सुद्धा काम केलं होतं. सध्या विद्या यांच्यासह त्यांच्या या दोन्ही मुली ‘इन्स्पेक्टर मंजू’ या मालिकेत झळकत आहेत. या तिघीजणी सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असतात.

आज आईच्या वाढदिवसानिमित्त नेहा आणि निकिता यांनी खास पोस्ट लिहिली आहे. त्या लिहितात, “आमच्या अत्यंत साध्या आणि प्रेमळ आईला वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा! तू आमची आई आहेस…हे खरंच आमचं भाग्य आहे. गेल्या तीन वर्षांबद्दल सांगायचं झालं तर, ही ३ वर्षं खरोखरंच अद्भुत होती. आपण एकत्र वेळ घालवला, मजामस्ती केली मी हे दिवस आयुष्यात कधीच विसरणार नाही. आपलं नातं इतकं खास आहे की, अनेकांना वाटणार सुद्धा नाही…तू आमची आई आहेस आणि आम्ही तुझ्या मुली. तूच आमचं संपूर्ण जग आहेस. खरंतर हे प्रेम शब्दांत व्यक्त करणं फार कठीण आहे. पण, तरीही सांगते…आई आमचं तुझ्यावर खूप-खूप प्रेम आहे. अजून एक गोष्ट आई…वय हा फक्त आकडा आहे. तू तर दिवसेंदिवस अजूनच तरुण आणि सुंदर होत चालली आहेस. आमच्या सुंदर आईला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा!”

विद्या सावळेंनी या पोस्टवर, “ही पोस्ट वाचून खरंच माझं मन भरून आलंय, लव्ह यू माय Angels!” अशी कमेंट केली आहे.

दरम्यान, नेहा आणि निकिता ‘इन्स्पेक्टर मंजू’ या मालिकेत सवी-कवी या भूमिका साकारत आहेत. शूटिंगमधून वेळ मिळाल्यावर या दोघीजणी मिळून भन्नाट डान्स व्हिडीओ बनवतात. त्यांचे हे रील्स व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात.