Nikhil Chavan & Anushka Sarkate Sangeet Ceremony : ‘कारभारी लयभारी’ या मालिकेमुळे निखिल चव्हाण आणि अनुष्का सरकटे यांची जोडी घराघरांत लोकप्रिय झाली. आता ही ऑनस्क्रीन जोडी खऱ्या आयुष्यात एकत्र येणार आहे. २३ जूनला रात्री अनुष्का-निखिलचा संगीतसोहळा थाटात पार पडला. संगीत सोहळ्यासाठी या जोडप्याने इंडो-वेस्टर्न लूक केला होता. निखिलने डिझायनर सूट आणि अनुष्काने सिल्व्हर कलरचा ड्रेस घातल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

अनुष्का-निखिलच्या संगीत सोहळ्याला राजकीय वर्तुळातील मान्यवरांसह मनोरंजन विश्वातील लोकप्रिय कलाकार सुद्धा उपस्थित होते. भरत जाधव, शिवानी बावकर, सिद्धार्थ जाधव, मनपीत पेम हे कलाकार हळदी समारंभालाच पोहोचले होते. तर २३ जूनला रात्री उशिरा निखिलच्या संगीत सोहळ्याला ‘लागिरं झालं जी’ मालिकेची टीम छत्रपती संभाजीनगरला पोहोचली.

‘लागिरं झालं जी’ या सुपरहिट मालिकेतून निखिल चव्हाण घराघरांत पोहोचला. त्याने या मालिकेत विक्याची ( विक्रम ) भूमिका साकारली होती. ही मालिका संपून आता जवळपास सहा वर्षे उलटली आहेत. तरीही या मालिकेचा चाहतावर्ग आजही मोठ्या प्रमाणात आहे. यापूर्वी किरण गायकवाडच्या लग्नात ‘लागिरं झालं जी’च्या टीमचं रियुनियन पाहायला मिळालं होतं. आता निखिलच्या लग्नाला सगळे कलाकार एकत्र पोहोचले आहेत.

किरण गायकवाड व त्याची पत्नी वैष्णवी कल्याणकर, ‘लागिरं झालं जी’ मालिकेची निर्माती श्वेता शिंदे, अभिनेता राहुल मगदूम अशी सगळी टीम निखिल-अनुष्काच्या लग्नाला पोहोचली आहे. ‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाड आणि निखिल यांची अनेक वर्षांपासून खूप घट्ट मैत्री आहे. त्यामुळे संगीत सोहळ्यात लाडक्या मित्राला आलेलं पाहताच निखिलने त्याला मिठी मारली. योगेश शिरसाट आणि भारत गणेशपुरे यांनी या संगीत सोहळ्याचं सूत्रसंचालन केलं.

निखिल-अनुष्काचा विवाहसोहळा २४ जूनला छत्रपती संभाजीनगरला पार पडणार आहे. या दोघांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, अनुष्का सरकटे सध्या ‘वचन दिले तू मला’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारतेय आणि निखिल सध्या ‘ऑल दि बेस्ट’ या नाटकात महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकतोय.