‘लागिरं झालं जी’ या सुपरहिट मालिकेतून अभिनेत्री विद्या सावळे घराघरांत लोकप्रिय झाल्या. यानंतर त्यांनी ‘जीव झाला येडापिसा’, ‘राजा राणीची गं जोडी’ अशा बऱ्याच गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं. गेल्या काही वर्षांत विद्या सावळे यांचा एक वेगळा चाहतावर्ग तयार झाला आहे. सध्या त्या ‘इन्स्पेक्टर मंजू’ या मालिकेत आपल्या दोन्ही मुलींसह महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत.

विद्या सावळे यांना जुळ्या मुली आहेत. आईच्या पावलांवर पाऊल ठेवत विद्या यांच्या दोन्ही मुलींनी काही वर्षांपूर्वी इंडस्ट्रीत पदार्पण केलं. या दोघींची नावं आहेत नेहा आणि निकिता. यापैकी नेहाने यापूर्वी ‘कलर्स मराठी’च्या ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेत सुद्धा काम केलं होतं. अभिनेत्रीसह तिच्या या दोन्ही मुली सध्या ‘इन्स्पेक्टर मंजू’ या मालिकेत झळकत आहेत. या तिघीजणी सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात.

नेहा आणि निकिता ‘इन्स्पेक्टर मंजू’ या मालिकेत सवी-कवी या भूमिका साकारत आहेत. शूटिंगमधून वेळ मिळाल्यावर या दोघीजणी मिळून भन्नाट डान्स व्हिडीओ बनवतात. नुकताच त्यांनी संजू राठोडच्या व्हायरल ‘लाल लाल कलरची बांगडी’ या गाण्यावर जबरदस्त डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

“लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल, चाल माझ्या सोबत चाल, नाच माझ्या सोबत चाल” असे या ‘Bangles’ गाण्याचे बोल आहेत. संजू राठोडने स्वत: हे गाणं लिहिलं असून त्यानेच कंपोझ सुद्धा केलं आहे. यामध्ये संजूच्या जोडीला ‘बिग बॉस’ आणि ‘शेकी’ फेम अभिनेत्री ईशा मालवीय झळकली आहे. मनोरंजन विश्वातील बऱ्याच कलाकारांनी गेल्या काही दिवसांत या गाण्यावर जबरदस्त डान्स केल्याचं पाहायला मिळालं आहे.

नेहा-निकिता डिझायनर ड्रेल घालून ‘लाल लाल कलरची बांगडी’ या गाण्यावर थिरकल्या आहेत. या व्हिडीओमध्ये या दोघींच्या बॅकग्राऊंडला भिंतीवर त्यांच्या आईचा डॅशिंग लूकमध्ये असलेला फोटो पाहायला मिळत आहे. विद्या सावळे यांचा पोलिसाच्या भूमिकेतील या रुबाबदार फोटोने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

व्हिडीओवर आलेल्या कमेंट्समध्ये या जुळ्या बहिणींच्या डान्स एनर्जीचं सर्वांनी भरभरून केलं आहे. “एक नंबर सवी-कवी”, “जबरदस्त डान्स केलात ताई तुम्ही दोघींनी”, “सुंदर डान्स…” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.