Lagnanantar Hoilach Prem Fame Marathi Actress : मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी गेल्या काही दिवसांत व्यवसाय क्षेत्रात पदार्पण केल्याचं पाहायला मिळालं. काही कलाकारांनी स्वत:चं रेस्टॉरंट सुरू केलंय, तर काही अभिनेत्रींनी कपड्यांचा विशेषत: साड्यांचे ब्रँड सुरू केले आहेत. प्राजक्ता माळी, अक्षया देवधर, ऐश्वर्या नारकर यांसारख्या अनेक अभिनेत्री आजच्या घडीला अभिनयाच्या जोडीला यशस्वी उद्योजिका म्हणून देखील ओळखल्या जातात. अशातच मराठी मालिकाविश्वातील एका लोकप्रिय अभिनेत्रीने ज्वेलरी ब्रँड सुरू केल्याची गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे. या अभिनेत्रीचं नावा आहे अनुष्का पिंपुटकर.

‘रंग माझा वेगळा’, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ अशा लोकप्रिय मालिकांमधून अनुष्का घराघरांत पोहोचली. तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. सध्या ती ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेत काव्या नंदिनीच्या धाकट्या बहिणीची म्हणजेच आरुषीची भूमिका साकारतेय. अभिनयाच्या जोडीला आता अनुष्काने स्वत:चा ज्वेलरी ब्रँड लॉन्च केला आहे.

अनुष्काच्या या नव्या बिझनेसचं नाव आहे ‘AdoreU by Anushka’. या माध्यमातून अभिनेत्री विविध स्टायलिश ज्वेलरी चाहत्यांच्या भेटीला घेऊन आली आहे. ही ज्वेलरी महिला दैनंदिन जीवनात अगदी सहज वापरू शकतात असं अनुष्काने तिच्या पोस्टमध्ये सांगितलं आहे.

अनुष्काने नव्या बिझनेसची घोषणा करताच चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तिच्या सहकलाकारांनी सुद्धा या पोस्टवर कमेंट्स करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय अनुष्काचा नवरा अभिनेता मेघन जाधवने या पोस्टवर पत्नीसाठी, “AdoreU माय लव्ह” अशी रोमँटिक कमेंट केली आहे.

दरम्यान, अनुष्का पिंपुटकरच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सांगायचं झालं तर, तिने अन् मेघन यांनी १६ नोव्हेंबर २०२५ रोजी लग्नगाठ बांधली. या दोघांच्या लग्नाला मराठी मालिकाविश्वातील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती. मेघन सध्या ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत जयंत ही भूमिका साकारत आहे. त्याची ही निगेटिव्ह भूमिका संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेत आहे.