Rohit Arya Case : मुंबईतील पवई येथे असलेल्या आरए स्टुडिओच्या इमारतीत १७ मुले आणि दोन वृद्धांना ओलीस ठेवून जाळण्याची धमकी देणाऱ्या रोहित आर्यचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला. शुक्रवारी ३१ ऑक्टोबर रोजी हा धक्कादायक प्रसंग घडला. हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आल्यावर आता मराठी कलाकारांकडून या घटनेबाबत विविध खुलासे केले जात आहेत. एनकाऊंटर झालेला आरोपी रोहित आर्यने अनेक मराठी कलाकारांशी संपर्क साधला होता. काही सेलिब्रिटी त्याच्या आरए स्टुडिओमध्ये गेल्याचंही समोर आलं आहे.

मराठी अभिनेता आयुष संजीव ही घटना घडण्याच्या चार दिवस आधीच रोहित आर्यला भेटला होता. यासह ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेतील मंजू म्हणजेच अभिनेत्री स्नेहल चांदवडकर सुद्धा या स्टुडिओमध्ये गेली होती. याबद्दल तिने पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

स्नेहल पोस्ट शेअर करत लिहिते, “नशीब म्हणू की काय म्हणू…खरंच शब्द नाहीत. ३० ऑक्टोबरला आरए स्टुडिओ पवई येथे ही भयानक घटना घडली. मी स्वतः त्या मुलांची कार्यशाळा घेतली होती; ज्यांना ओलीस ठेवण्यात आलं होतं. देवाच्या कृपेने ती सगळी मुलं सुखरुप आहेत आणि मी सुद्धा भाग्यवान आहे. ज्यादिवशी ही घटना घडली त्यादिवशी आमचं कोणतंही चित्रीकरण नव्हतं…जेव्हा ही घटना कानावर आली तेव्हा खरंच खूप धक्का बसला.”

स्नेहल ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या फोनोमध्ये पुढे म्हणाली, “मला २७ ऑक्टोबरला मिटींगसाठी याठिकाणी बोलावलं होतं. कारण, त्यांनी माझं काम आधीच पाहिलं होतं. मी २७ नाही गेले पण, २९ तारखेला गेले होते. त्याठिकाणी मी रोहित आर्यला भेटले. आमची एक मिटींग झाली, तिथे अजूनही बरेच कलाकार बसले होते. सगळ्या कलाकारांना बसवून वेबसीरिजची माहिती देण्यात आली. त्यात कोणता कलाकार कोणती भूमिका करेल याबद्दलही माहिती देण्यात आली. मी आणि माझ्याबरोबर NSD ची एक आर्टिस्ट होती… आम्हाला सांगण्यात आलं होतं की, तुम्हाला येऊन मॉकशूट करावं लागेल. कारण मुलांच्या पालकांना शूटिंग वगैरे काय असतं ते समजलं पाहिजे. आम्ही एक सीन सुद्धा शूट केला…पण, त्यानंतरच्या शूटसाठी मी गेले नव्हते. कारण, माझं काहीच शूटिंग शेड्युलमध्येही नव्हतं. दुपारपर्यंत सगळं व्यवस्थित सुरू होतं. पण, संध्याकाळी मला फोन आला की, त्यांनी वेबसीरिजची ती घटना Reel साठी नाहीतर, Real मध्ये केलीये. मला खरंच खूप मोठा धक्का बसला.”

दरम्यान, लहान मुलांचा मानवी ढाल म्हणून वापर करीत रोहितने पोलिसांवर गोळीबार केला होता. प्रत्युत्तरात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आरोपी जखमी झाला. त्याला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता डॉक्टरांनी मृत घोषित केलं.