Anagha Atul on Mrunal Dusanis: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ ही मालिका प्रेक्षकांची लाडकी मालिका आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते. काव्या-पार्थ, जीवा-नंदिनी, मानिनी, रम्या ही आणि मालिकेतील सगळीच पात्रे लक्ष वेधून घेत असतात.
मालिकेत दाखविल्याप्रमाणे, काव्या प्रेग्नेंट आहे. तिच्या डोहाळेजेवणाच्या कार्यक्रमाची तयारी सुरू आहे. दुसरीकडे नंदिनीने घरात सगळ्यांना ती प्रेग्नेंट असल्याचे सांगितले आहे. मात्र, खरे तर तसे नाही. ती व जीवा सरोगसीच्या माध्यमातून पालक होणार आहेत. आर्या ही सरोगेट मदर आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून आर्या व नंदिनी यांच्यातील संबंध बिघडले आहेत, त्यांच्यात कुरबुरी होताना दिसत आहेत. त्यांच्यात जो करार झाला होता, ती कागदपत्रे आर्या शोधत असल्याचे नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
मृणाल दुसानिस व अनघा अतुलचे कसे आहे बॉण्डिंग?
मालिकेत नंदिनी ही भूमिका अभिनेत्री मृणाल दुसानिसने साकारली आहे, तर आर्या ही भूमिका अनघा अतुलने साकारली आहे. काही दिवसांपूर्वीच अनघाची मालिकेत एन्ट्री झाली आहे. ऑनस्क्रीन जरी त्यांच्यात कुरबूर पाहायला मिळत असली तरी खऱ्या आयुष्यात मात्र त्यांच्यात मैत्रीचे नाते आहे. नुकताच त्यांनी स्टार मीडिया मराठी या चॅनेलबरोबर संवाद साधला. त्यावेळी त्यांनी त्यांच्यातील बॉण्डिंगबद्दल सांगितले.
मृणाल दुसानिस आहे नाशिकची लेक
अनघा म्हणाली, “मला नंदिनी खूप आवडते.” त्यावर मृणाल दुसानिस म्हणाली, “आणि मृणालचं काय?”, त्यावर अनघा म्हणाली, “मला मृणाल तर आवडतेच, कारण मृणाल नाशिकची आहे”, असे म्हणत मृणाल तिला आवडत असल्याचे सांगितले. तसेच मृणालनेही आमची आर्या खूप गोड आहे, असे म्हणत तिचे कौतुक केले; त्यामुळे ऑनस्क्रीन भांडणे, वाद दिसत असले तरी खऱ्या आयुष्यात त्यांच्यात चांगली मैत्री आहे.
नंदिनी सरोगसीद्वारे आई होणार असल्याचे सत्य कुटुंबातील कोणालाही माहीत नाही. आता आर्याचे वागणे बदलल्यामुळे मालिकेत काय ट्विस्ट येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, मालिकेत सध्या काव्याच्या डोहाळेजेवणाच्या सीनचे शूटिंग सुरू आहे. त्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मालिकेतील कलाकार अनेकदा व्हायरल ट्रेंड करत असतात. विविध गाण्यांवर ते व्हिडीओ शेअर करतात. त्यांच्या रील्स, डान्स व्हिडीओंना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतो.
