‘लग्नानंतर होईलच प्रेम’ फेम अभिनेता विवेक सांगळेचं इन्स्टाग्राम अकाउंट सस्पेंड केलंय. विवेकने यासंदर्भात अपील केलं आहे. तब्बल ६५ दिवस उलटले, तरीही त्याच्या अपीलवर अद्याप निर्णय झालेला नाही. विवेक सांगळेने ३ जानेवारी २०२६ रोजी इन्स्टाग्रामकडे अपील दाखल केलं होतं.

स्टार प्रवाहवरील ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा विवेकला यापूर्वी ‘भाग्य दिले तू मला’ या लोकप्रिय मालिकेमुळे मोठी ओळख मिळाली होती. त्याचं व्हेरिफाईड इन्स्टाग्राम अकाउंट अचानक बंद झाल्यानंतर त्याने प्लॅटफॉर्मने सांगितलेली नियमित अपील प्रक्रिया पूर्ण केल्याचं सांगितलं आहे.

चाहत्यांशी संपर्क कायम ठेवण्यासाठी विवेकने नवे इन्स्टाग्राम अकाउंट सुरू केले असून चाहत्यांना ते फॉलो करण्याचे आवाहन केले आहे. जुने अकाउंट अद्याप बंद असून ते कधी सुरू होईल, त्याची कल्पना नसल्याने विवेकने आता नवी सुरुवात करायचं ठरवलं आहे.

विवेकच्या मते, त्यांच्या अकाउंटवरील ज्या कंटेंटबाबत आक्षेप नोंदवला गेला होता त्याबाबत संबंधित ब्रॉडकास्टरने नंतर लेखी स्पष्ट केलं की ते ऑटोमेटेड मॅचेस होते आणि कोणतीही मॅन्युअल कॉपीराइट तक्रार दाखल करण्यात आलेली नव्हती. हे स्पष्टीकरण त्याने इन्स्टाग्रामच्या सपोर्ट सिस्टीमला पाठवून नव्या मॅन्युअल रिव्ह्यूची विनंती केली आहे.

विवेक सांगळेचा व्हिडीओ

नव्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अकाउंट बंद झाल्यानंतर इंस्टाग्रामने सांगितलेली सर्व नियमित प्रक्रिया पूर्ण केल्याचं विवेकने नमूद केलं. मेटाच्या मुंबईतील टीमला तसेच अमेरिकेतील सपोर्ट चॅनेललाही ईमेल पाठवले, पण अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

अकाउंट बंद होण्यापूर्वी विवेकचे इन्स्टाग्राम अकाउंटवर १.४२ लाखांहून अधिक फॉलोअर्स होते. त्याच्या अनेक रील्सना मिलियनमध्ये व्ह्यूज मिळाले होते. एक व्हिडीओ तर तब्बल ३२ मिलियनवर गेला होता. हे अकाउंट खूप मेहनतीने तयार केलं होतं आणि फॉलोअर्स व व्ह्यूज मिळत होते, पण ते काहीच पूर्वकल्पना न देता मेटाने बंद केल्याने विवेकने नाराजी व्यक्त केली आहे.

आजच्या काळात कलाकारांसाठी इन्स्टाग्राम व इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे केवळ चाहत्यांशी संवादाचे माध्यम नसून प्रोजेक्ट प्रमोशन, ब्रँड कोलॅबोरेशन आणि डिजिटल ओळख यासाठी महत्त्वाचे साधन बनले आहे. त्यामुळे व्हेरिफाईड अकाउंट अचानक बंद झाल्यास कलाकारांच्या डिजिटल उपस्थितीवर तसेच व्यावसायिक संधींवरही परिणाम होऊ शकतो, असे इंडस्ट्रीतील काही निरीक्षकांचे मत आहे.

दरम्यान, विवेकने या संपूर्ण प्रकरणात प्लॅटफॉर्मच्या प्रक्रियेचा आदर असल्याचं स्पष्ट केलं आहे. वाद न वाढवता नियमित प्रक्रियेने निर्णयाची वाट बघत असल्याचं विवेकने सांगितलं.